esakal | 'कसले अभ्यासदौरे, या तर सहली'; करदात्यांचे पैसे उधळू नका! भाजप नगरसेवकाची भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

'कसले अभ्यासदौरे, या तर सहली'; करदात्यांचे पैसे उधळू नका! भाजप नगरसेवकाची भूमिका

BMC नगरसेवकांच्या अभ्यासदौरावर दरवर्षी किमान पाच ते सहा कोटी रुपयांचा खर्च होतो; मात्र त्याचा कितपत फायदा झाला हा प्रश्‍न आहे. त्यामुळे हे अभ्यासदौरे नसून केवळ सहली आहेत

'कसले अभ्यासदौरे, या तर सहली'; करदात्यांचे पैसे उधळू नका! भाजप नगरसेवकाची भूमिका

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई  : महापालिकेच्या नगरसेवकांच्या अभ्यासदौरावर दरवर्षी किमान पाच ते सहा कोटी रुपयांचा खर्च होतो; मात्र त्याचा कितपत फायदा झाला हा प्रश्‍न आहे. त्यामुळे हे अभ्यासदौरे नसून केवळ सहली आहेत. त्यामुळे त्यावर पैसे उधळण्याची गरज नाही, अशी ठाम भूमिका भाजपचे नगरसेवक अनिष मकवानी यांनी शिक्षण समितीच्या अर्थसंकल्पीय बैठकीत मांडली. 

नगरसेवकांचे अभ्यासदौरे हे निव्वळ सहली असतात. त्यांचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे सहलीसाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. हे करदात्यांचे पैसे असून आपण त्यांचे विश्‍वस्त आहोत. त्यामुळे या पैशाचा योग्य वापर होणे गरजेचे आह, अशी परखड भूमिका मकवानी यांनी मांडली. शिक्षण विभागाच्या आगामी अर्थसंकल्पावर शिक्षण समितीत चर्चा सुरु आहे. इतर शहरात प्राथमिक शिक्षणाचे नियोजन पाहणे गरजेचे असेल, तर त्यातील तज्ज्ञांचे दौरे करण्यास हकरत नाही. पण अभ्यासदौरांच्या नावावर चाळीच-पन्नास लोकांनी जाणे योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिकेच्या विविध समितींचे सदस्य दरवर्षी परराज्यात दौऱ्यांवर जातात. यात प्रामुख्याने केरळ, चंदिगड, दिल्ली, ईशान्य भारतीतील निसर्गरम्य ठिकाणी हे दौरे असतात. त्यातून मुंबईला आतापर्यंत काय फायदा झाला हा संशोधनाचा प्रश्‍न आहे. माजी महापौर डॉ.शुभा राऊळ आरोग्य समितीत असताना अशाच दौऱ्यातून त्यांनी आर्युवैद्यकीय दवाखाने आणि बाह्य रुग्ण विभाग तसेच रुग्णालयाची संकल्पांना मांडली होती. माजी आरोग्य समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यालयात आर्युर्वेदिक दवाखाने सुरु केले. असे काही अपवादा वगळता अभ्यासदौरांचा मुंबईला फारसा फायदा झाला नाही

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

bmc marathi news BJP corporators criticism on study tours latest update