मास्क वापरा!, मुंबईत १३ दिवसात ९ हजार नागरिकांवर कारवाईचा बडगा

समीर सुर्वे
Monday, 28 September 2020

गेल्या 13 दिवसात 9 हजार 218 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने आतापर्यंत 52 लाख 76 हजाराचा दंड वसूल केला आहे. पहाटेपासूनच महापालिकेची पथक मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करत आहेत.

मुंबई: सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यावर महापालिकेने कारवाईचा वेग वाढवला आहे. एप्रिलपासून 4 महिन्यात 4 हजार 989 जणांवर कारवाई करण्यात आली होती.  गेल्या 13 दिवसात 9 हजार 218 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने आतापर्यंत 52 लाख 76 हजाराचा दंड वसूल केला आहे. पहाटेपासूनच महापालिकेची पथक मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करत आहेत.

कोविडमुळे एप्रिल महिन्यापासून राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. सुरुवातीला मास्क वापरणाऱ्यांकडून 1 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल केला जात होता. मात्र, हा दंड वसूल होणे अवघड असल्यानं पालिका मास्क न लावणाऱ्यांना इशारा देऊनही सोडत होती. एप्रिल पासून 12 सप्टेंबरपर्यंत पालिकेनं 4 हजार 989 लोकांकडून 33 लाख 68 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, नंतर मास्क न वापरणाऱ्यांकडून 200 रुपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेऊन ही कारवाई अधिक कठोर करण्यात आली. 13 ते 26 सप्टेंबर या काळात 9 हजार 218 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातून पालिकेनं 19 लाख 07 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. 

यात वसूल होणारा दंड महत्त्वाचा नाही तर नागरिकांना मास्कचं महत्व कळण्यासाठी ही कारवाई असल्याचं पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

पालिकेनं ही कारवाई करण्याची जबाबदारी क्लिन अप मार्शल, घन कचरा विभागातील कर्मचारी तसेच उपद्रव शोधक पथकावर सोपवली आहे. ही सर्व पथक सकाळपासूनच कामाला लागतात. सकाळी प्रभात फेरीसाठी येणाऱ्यांकडूनही दंड वसूल केला जात आहे.

मास्क न वापरणारे पहिले तीन विभाग (13 ते 26 सप्टेंबर)

  • विभाग - कारवाई - वसूल केलेला दंड 
  • कांदिवली - 739- 147800
  • चेंबूर -629- 125800
  • सॅन्डहर्स्ट रोड -581- 116200

-------------------

(संपादनः पूजा विचारे) 

BMC taking action against 9000 citizens not wear masks Mumbai public area


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC taking action against 9000 citizens not wear masks Mumbai public area