महापालिकेच्या तिजोरीला धक्का, वृक्ष प्राधिकरणाचे करांचे उत्पन्न 30 टक्‍क्‍यांनी घटले

समीर सुर्वे
Sunday, 3 January 2021

कोविड लॉकडाऊनमुळे महानगर पालिकेच्या तिजोरीलाच धक्का बसला आहे. वृक्ष प्राधिकरणाला कर, शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नात 30 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

मुंबई: कोविड लॉकडाऊनमुळे महानगर पालिकेच्या तिजोरीलाच धक्का बसला आहे. वृक्ष प्राधिकरणाला कर, शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नात 30 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी विशेष निधीतून अंशदान करण्यात येणार आहे. दुसऱ्या बाजूला मालमत्ता कराचीही वसुलीही धिम्या गतीने सुरु असून आतापर्यंत 750 कोटी रुपयांच्या आसपास वसुली झाली आहे.

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचा अर्थसंकल्प 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प महासभेत सादर करण्यात आला आहे. त्यात 2020-21 या वर्षाचा सुधारीत अंदाज मांडण्यात आला आहे.

अधिक वाचा- कोविड पोस्ट ओपीडीकडे रुग्णांची पाठ, केवळ हजार रुग्णांची हजेरी

2019 च्या ऑक्‍टोबर महिन्यात मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात 112 कोटी 5 लाख रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज होता. त्यातील कर, विविध शुल्क, गुंतवणुकीवरील उत्पन्न, विक्री भाडे, सर्वसाधारण निधीतून अंशदान या मार्गातून 70 कोटी 2 लाख रुपयांचे उत्पन्न अंदाजित होते. मात्र आता 48 कोटी रुपये 52 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी सर्वसाधारण निधीतून विशेष अंशदान वाढविण्यात आले आहे. मुळ अर्थसंकल्पानुसार 41 कोटी 69 लाख रुपयांचे हे अंशदान घेण्यात येणार होते. ते आता 64 कोटी रुपये घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने महासभेत सादर केली आहे. त्यामुळे उत्पन्नाचा आकडा वाढून तो 112 कोटी रुपयांवरुन 113 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोविडच्या लॉकडाऊनमुळे महानगर पालिकेच्या उत्पन्नाला फटका बसत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याच बरोबर मालमत्ता कराचीही अपेक्षीत वसुल होत नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 750 कोटी रुपयांच्या आसपास मालमत्ता कराची वसुली झाली आहे. या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून 6 हजार 768 कोटी रुपयांचे उत्पन्न अंदाजित होती. मात्र आता पालिकेने मार्च अखेरपर्यंत 5 हजार कोटी रुपयांपर्यंत वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BMC Tree authority tax revenue fell by 30 per cent Property tax also slow


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC Tree authority tax revenue fell by 30 per cent Property tax also slow