esakal | फ्लेमिंगो दर्शनासाठी १५ नोव्हेंबरपासून बोट सेवा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

फ्लेमिंगो दर्शनासाठी १५ नोव्हेंबरपासून बोट सेवा सुरू

ठाणे खाडी परिसरात ऐरोली येथे रोहित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. या पक्ष्यांना जवळून न्याहाळता यावे, यासाठी १५ नोव्हेंबरपासून बोट सफर सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे फ्लेमिंगो पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. मान्सूनमध्ये ही बोट सेवा बंद केली जाते.

फ्लेमिंगो दर्शनासाठी १५ नोव्हेंबरपासून बोट सेवा सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : ठाणे खाडी परिसरात ऐरोली येथे रोहित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. या पक्ष्यांना जवळून न्याहाळता यावे, यासाठी १५ नोव्हेंबरपासून बोट सफर सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे फ्लेमिंगो पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. मान्सूनमध्ये ही बोट सेवा बंद केली जाते.

ठाण्याच्या खाडीत गुजरातच्या कच्छच्या रणातून फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होते. साधारण ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर महिन्यात हे पक्षी मोठ्या संख्येने ऐरोलीतील ठाणे खाडीत दाखल होतात. मान्सून सुरू झाल्यांनतर हे रोहित  पक्षी निघून जातात. मात्र, पक्षिप्रेमींसह पर्यटकांना फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन करता यावे, याकरिता ऐरोलीच्या केंद्रातून फेब्रुवारी २०१८ मध्ये बोट सोडण्यात आली होती. फ्लेमिंगो दर्शन फेरीच्या माध्यमातून फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान सुमारे १३ लाख रुपयांचे उत्पन्न गोळा झाले होते. नोहेंबर २०१८ ते मे २०१९ या कालावधीत २८ लाख रुपयांचे उत्पन्न झाले होते, अशी माहिती कांदळवन संरक्षण विभागाने दिली आहे. ठाण्याच्या खाडीत फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे दिसू लागल्याने पर्यटकांसाठी ऐरोली केंद्रातून १५ नोव्हेंबरपासून फ्लेमिंगो दर्शन फेरी सुरू होणार आहे. भरतीनुसार फेरी सोडण्यात येणार आहे. बोटिंग सुरू करण्याअगोदर त्याची चाचणी करण्यात येणार आहे.

खारफुटी आणि सागरी जैवविविधतेविषयी माहिती देणारा किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्र कांदळवन संरक्षण विभागाने ऐरोली खाडीलगत उभारले आहे. या केंद्रात माहिती देणारी दोन मोठी दालने असून, खेकड्यांची शेती, खाडी निरीक्षण, फ्लेमिंगो दर्शन फेरी असे उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येतात. या माध्यमातून वन विभागाचे उत्पन्नही वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या बोटिंगला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. या सागरी जैवविविधता केंद्राच्या ठिकाणी मत्स्यालयदेखील उभारण्यात येणार असून, या सागरी जैवविविधता केंद्राच्या ठिकाणी उरण येथे सापडलेल्या ब्ल्यू व्हेल माशाचा सांगडा ठेवण्यात येणार आहे. 

अशी असेल फ्लेमिंगो सफारी
ऐरोली केंद्रातून फ्लेमिंगो दर्शनासाठी ठाणे खाडीत सोडल्या जाणाऱ्या बोटींच्या साह्याने पर्यटकांना १० किलोमीटर खाडी परिसरात विहार करता येणार असून, फ्लेमिंगोंचे दर्शन घडविले जाणार आहे. साधारण पाऊण तास बोटींमधून फिरवण्यात येणार आहे. यासाठी प्रतिव्यक्ती ३०० रुपये आकारण्यात येतील. शनिवार-रविवारी फेरी शुल्क ४०० रुपये असणार आहे. कुटुंब किंवा मित्रमंडळींसोबत एकत्र फ्लेमिंगो दर्शनाचा आनंद लुटण्यासाठी सात आसनी कौस्तुभ नावाची बोट उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी पर्यटकांना पाच हजार रुपये मोजावे लागणार आहेत. 

अवकाळी पावसामुळे रोहित पक्षाचे प्रमाण काहीसे कमी आहे. मात्र, खाडी परिसरात येत्या काही दिवसांत रोहित पक्षी येण्याचे प्रमाण वाढणार असल्यामुळे १५ नोव्हेंबरपासून बोटिंग सुरू होईल. 
-एन. जी. कोकरे, कांदळवन क्षेत्र अधिकारी.

loading image