गटारात वाहून गेलेल्या लहानग्याचा मृतदेह सापडला खाडीकिनारी; आकस्मिक मृत्यूची नोंद

विक्रम गायकवाड
Sunday, 13 September 2020

दोन दिवसांपूर्वी अनिकेत दिलीपराव सिंग हा 7 वर्षीय मुलगा मुसळधार पावसामुळे गटारात पडून वाहून गेला होता.

 

नवी मुंबई : दोन दिवसांपूर्वी अनिकेत दिलीपराव सिंग हा 7 वर्षीय मुलगा मुसळधार पावसामुळे गटारात पडून वाहून गेला होता. त्याचा शोध सुरू असतानाच रविवारी सायंकाळी नेरूळच्या सारसोळे येथील खाडीकिनारी त्याचा मृतदेह आढळून आला.  

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था, आयडॉलच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; 'असे' असणार परिक्षेचे स्वरूप

अनिकेत सिंग हा शिरवणे भागात राहण्यास असून, तो 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. त्याच वेळी मुसळधार पाऊस सुरू झाला होता. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे त्याला गटाराचा अंदाज न आल्याने तो त्यात पडला होता. नागरिकांनी त्याला तत्काळ गटारात शोधण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, पावसाचा जोर जास्त असल्याने आणि सगळीकडे पाणी साचल्याने अनिकेत गटारातील पाण्यातून वाहून गेला. 

मुंबईकरांनो खबरदार! मास्क नसेल तर भरावा लागणार दंड; BMC ची कारवाई सोमवारपासून सुरू

तासाभरानंतर पाऊस जोर कमी होताच त्याच्या पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी गटारातून वाहून गेलेल्या अनिकेतचा पुन्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या वेळीही त्याचा शोध लागला नव्हता. दोन दिवसांपासून त्याचे पालक व नातेवाईक त्याचा शोध सगळीकडे घेत होते. अखेर रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अनिकेतचा मृतदेह सारसोळे येथील खाडीकिनारी मच्छीमारांना आढळून आला. नेरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याचा मृतदेह सापडताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी नेरूळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The body of a child carried in the drainage was found by the creek