Corona Vaccination: पालिका मुंबईत कोरोना लसीकरण केंद्रात करणार वाढ

मिलिंद तांबे
Wednesday, 20 January 2021

मुंबई महानगरपालिका 24 विभाग कार्यालयांमध्ये लसीकरणाच्या केंद्रांमध्ये वाढ करणार आहे. 

मुंबई: मुंबई महानगरपालिका 24 विभाग कार्यालयांमध्ये लसीकरणाच्या केंद्रांमध्ये वाढ करणार आहे. प्रत्येक विभागात तीन लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता घराजवळच कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. 

मुंबईत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 1 हजार 900 पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले. कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे लसीकरणाचा कार्यक्रम दोन दिवस स्थगित करण्यात आला होता. मंगळवारपासून पुन्हा कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.

मुंबईसह राज्यात चार दिवस लसीकरण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार या चार दिवशी लस दिली जाईल. मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज 4 हजार जणांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करण्यात येणार आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत पहिल्या टप्प्यात 1.25 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाइन कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षापुढील नागरिकांना लस दिली जाणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अधिक जणांना लस द्यायची असल्याने पालिका प्रशासनाने आपल्या लसीकरण केंद्रात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

लसीकरणाचा तिसरा टप्पा ही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्धारित लसीकरण केंद्रांवर लाभार्थींची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी टाळण्यासाठी पालिका प्रत्येक विभागात लसीकरण केंद्र सुरु करणार आहे असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. प्रत्येक विभागात तीन लसीकरण केंद्र सुरु केली जाणार आहेत. मुंबईत पालिकेचे 24 विभाग कार्यालय असून त्यामध्ये एकूण 72 केंद्र तयार केली जाणार आहेत. ही केंद्रे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी असणार आहेत असे ही काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा-  शिवसेनेकडून टिपू सुलतानचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी, भाजपची घणाघाती टीका

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण कार्यक्रमात दिवसाला साधारणता 10 हजार पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागणार आहे. त्या कामासाठी मोठा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग लागणार असून त्यासाठी 10 हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना लसीकरणाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. या केंद्रामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील व्यक्तींना त्यांच्या घराजवळच लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे असे ही काकाणी यांनी पुढे सांगितले.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bombay Municipal Corporation will increase number Vaccination centers 24 divisional offices


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bombay Municipal Corporation will increase number Vaccination centers 24 divisional offices