शिवसेनेकडून टिपू सुलतानचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी, भाजपची घणाघाती टीका

कृष्ण जोशी
Wednesday, 20 January 2021

वादग्रस्त टिपू सुलतान याचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी शिवसेनेने सुरु केल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

मुंबई: वादग्रस्त टिपू सुलतान याचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी शिवसेनेने सुरु केल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. सत्तेसाठी शिवसेना पुरती लाचार झाल्याची टीका त्यांनी केली आहे. 

शिवसेना नेत्यांनी टिपू सुलतानाचा वाढदिवस साजरा करण्याचे पोस्टर प्रसिद्ध केले असून त्यात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या गळ्यातील भगवा शेला काढून त्याजागी हिरवा शेला घालण्याचे पापही पूर्ण झाले आहे, अशी जळजळीत टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

शिवसेनेचे मिरा भाईंदर युवा संघटक सलमान हाशमी यांनी टिपू सुलतानाच्या जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे पोस्टर प्रकाशित केले असून त्यावर आमदार प्रताप सरनाईक, खासदार राजन विचारे, मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंद दिघे यांचीही फोटो आहेत. या पोस्टरवरून शिवसेनेवर टीका करणारा व्हिडिओ भातखळकर यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शिवसेनेने केव्हाच भगवा सोडून हिरवा हाती घेतला, हिंदुत्व विसरून गेले आणि आता त्यांनी राष्ट्रपुरुषही बदलले. औरंगाबादचे संभाजीनगर होणे शक्यच नाही, पण धर्मांध अत्याचारी टिपू सुलतानचा वाढदिवसही धूमधडाक्यात साजरा करण्याचे काम शिवसेना मतांसाठी लाचारीने करते आहे, अशी कठोर टीका भातखळकर यांनी केली आहे. हिरव्या रंगाच्या या टिपू सुलतानच्या पोस्टरमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्यावरही हिरवा रंगच दिसत असून त्यावरून त्यांच्या गळ्यातले भगवे उपरणेही काढून हिरवे घालण्याचे पाप पूर्ण झाले आहे, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. 

शिवसेना सत्तेसाठी पुरती लाचार झाली आहे हेच या पोस्टरवरून दिसून येत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. यापूर्वीही शिवसेनेने ऑनलाईन अजान स्पर्धा आयोजित केली होती. तसेच वडाळा विभागाच्या उर्दू कॅलेंडरमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे असे नमूद करण्यात आले होते. त्यावेळीही भातखळकर यांनी शिवसेनेवर सडकून टिका केली होती.

हेही वाचा- मुंबईत वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा लस टोचून घेण्यास अल्प प्रतिसाद

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Shiv Sena prepares celebrate Tipu Sultan birthday BJP criticism


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena prepares celebrate Tipu Sultan birthday BJP criticism