मुंबईतील फाऊंटन बुक स्ट्रीट सुनासुनाच... 20 टक्‍क्‍यांहून कमी पुस्तकांची विक्री, विक्रेते आर्थिक संकटात

दिनेश चिलप मराठे
Wednesday, 28 October 2020

मुंबईतील बुक स्ट्रीट म्हणून गेल्या कित्येक दशकांपासून वाचकांची बौद्धिक भूक भागविणारी हुतात्मा चौक येथील फाऊंटन स्ट्रीटवरील जुन्या-नवीन पुस्तकांची गल्ली लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही ओस आहे. लॉकडाऊनचा येथील पुस्तक विक्रेत्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला. रस्त्यावरच्या दुकानांप्रमाणे या भागातील नामवंत बुक स्टोअरचीही हीच परिस्थिती आहे. सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतरही येथील जवळपास 20 टक्के पुस्तकांची विक्री न झाल्याने विक्रेते हतबल झाले आहेत. 

मुंबादेवी : मुंबईतील बुक स्ट्रीट म्हणून गेल्या कित्येक दशकांपासून वाचकांची बौद्धिक भूक भागविणारी हुतात्मा चौक येथील फाऊंटन स्ट्रीटवरील जुन्या-नवीन पुस्तकांची गल्ली लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही ओस आहे. लॉकडाऊनचा येथील पुस्तक विक्रेत्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला. रस्त्यावरच्या दुकानांप्रमाणे या भागातील नामवंत बुक स्टोअरचीही हीच परिस्थिती आहे. सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतरही येथील जवळपास 20 टक्के पुस्तकांची विक्री न झाल्याने विक्रेते हतबल झाले आहेत. 

अधिक वाचा : दिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज एक हजार जादा फेऱ्या; परिवहन मंत्र्यांची माहिती

फाऊंटन बुक स्ट्रीटवर सर्व प्रकारची जवळपास लाखांच्यावर पुस्तके विक्रीस आहेत. अवघ्या शंभर रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतची पुस्तके येथे मिळतात. 50 टक्के किमतीत जुन्या पुस्तकांची खरेदी-विक्री येथे केली जाते. पुस्तकांची मांडणी इमारतींच्या मजल्याप्रमाणे रचलेली आहे.

यात 80 टक्के इंग्रजी आणि 20 टक्के मराठी-हिंदी पुस्तके आहेत. शैक्षणिक पुस्तकांपासून वास्तववादी, लोककथा, आंतरराष्ट्रीय चरित्र कथा, स्पर्धा परीक्षा, कॉमिक्‍सला नेहमी मोठी मागणी असते. मात्र, आता ग्राहकांअभावी पुस्तके पडून असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
 
जूनपासून हुतात्मा चौकातील किताब खाना हे बुक स्टोअर सुरू आहे. मात्र, आतापर्यंत 20 टक्‍क्‍यांहूनही कमी पुस्तकांची विक्री झाल्याचे या बुक स्टोअरचे व्यवस्थापक टी. जगत यांनी सांगितले. उर्जित पटेल यांचे 'ओव्हर ड्राफ्ट', बॉब वुडवर्ड यांचे 'रेज', मनी मॉर्गन यांचे 'सायकोलॉजी ऑफ मनी' आणि एलिना फेरिण्टे यांचे 'लाईनलाईफ ऑफ एडल्ट' या पुस्तकांना आजही मागणी आहे.

क्लिक करा : आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून दिले जीवनदान, मातेची यशस्वी प्रसूती

मात्र, एकंदरित पुस्तकांची विक्री कमी असल्याने वाचकांची वाट पाहण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याची हतबलता त्यांनी व्यक्त केली. याशिवाय येथील नवीन पुस्तकांचे वातानुकूलित शोरूम असलेल्या सोमय्या भवनमधील पुस्तकेही गिऱ्हाईकांअभावी पडून आहेत. 

काही दिवसांपासून पुन्हा व्यवसायाला सुरुवात केली; परंतु पूर्वीप्रमाणे खरेदीदार, विद्यार्थी, शिक्षक, वाचक, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा ओघ नाही. केवळ घरखर्च भागवण्याएवढे पैसे हाती येत आहेत. मुलांच्या ऑनलाईन क्‍लासेसमुळे खर्च वाढल्याने मला म्युचुअल फंडाची रक्कमही काढावी लागली आहे. 
- नीलेश त्रिवेदी, ग्लोबल बुक सेंटर. 

स्पर्धा परीक्षांपासून फिक्‍शनपर्यंत सर्वच पुस्तकांची खरेदी मंदावली आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतरही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने दिवसेंदिवस आर्थिक स्थिती बिकट होत आहे. 
- दिलीप महींदकर, विक्रेते. 

--------------------------
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Book sellers on Fountain Street in Mumbai in financial crisis