चालत्या बोटीच्या इंजिनमध्ये पडला चिमुकला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया या प्रवासी बोटीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नवी मुंबई : जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया या प्रवासी बोटीने कुलाबा येथे जाणाऱ्या भारतीय वायुसेनेतील अधिकाऱ्याच्या मुलाचा बोटीतील इंजिनच्या डक्‍टमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 25) घडली. न्हावा-शेवा पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेल्या प्रवासी बोटीचे मालक व बोटीवरील कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. 

महत्त्वाची बातमी - सावधान! फटका गँग पुन्हा सक्रिय

हरविंदर लखपत सिंग (35) हे जेएनपीटी टाऊनशीपमध्ये कुटुंबासह राहावयास असून सध्या ते जेएनपीटी-न्हावाशेवा येथील भारतीय वायुसेनेच्या तळावर सार्जंट म्हणून काम पाहतात. 25 जानेवारी रोजी हरविंदर सिंग यांना पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने ते उपचारासाठी जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया या प्रवासी बोटीने कुलाबा येथील अश्विनी आयएनएचएस रुग्णालयात जात होते. या वेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अमरित कौर, मुले करणदीप आणि अर्जुनदीप हे होते. सकाळी 10.15 च्या सुमारास प्रवासी बोट गेटवेच्या दिशेने निघाल्यानंतर करणदीप बोटीवरील स्नॅक्‍स सेंटरमधून चिप्स घेण्यासाठी गेला. 

हेही वाचा - गुजरातमधून येणारा 'हा' पदार्थ तुम्हाला आजारी पडू शकतो.

तेव्हाच करणदीप बोटीवरील स्नॅक्‍स स्टॉलच्या समोर असलेल्या इंजिन डक्‍टमध्ये पडला. त्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने बोट चालकाने तात्काळ इंजिन बंद केले; मात्र तोपर्यंत करणदीप इंजिनमध्ये तीन ते चार वेळा फिरला जाऊन तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ अश्विनी आयएनएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान रविवारी (ता. 26) पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हरविंदर सिंग यांनी सोमवारी न्हावा-शेवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया या प्रवासी बोटीच्या मालकासह त्यावरील कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली. 

web title : boy fell into the engine of the moving boat
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy fell into the engine of the moving boat