माणगावात १३८ बीएलओ शिक्षकांचा ऑनलाईन कामांवर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

माणगाव तालुक्‍यातील १३८ बीएलओ शिक्षकांनी ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

माणगाव (वार्ताहर) : माणगाव तालुक्‍यातील १३८ बीएलओ शिक्षकांनी ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन कामामुळे शिक्षकांचे शाळांकडे दुर्लक्ष होणार आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना अभ्यासापासून वंचित राहून नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

माणगाव तहसीलदारांनी तालुक्‍यातील बीएलओ यांच्या सभेचे गुरुवारी (ता. ५) आयोजन केले होते. यात नवीन मतदार नोंदणी, हरकती, दुरुस्ती, मयत या नोंदी घरोघरी जाऊन करावयाच्या आहेत. केलेल्या कामाचे फोटो आणि कामाची माहिती आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन पाठवायची आहे. हे सर्व काम करताना शिक्षकांचा अधिकचा वेळ जातो. यात शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच शाळा प्रसिद्धी, प्रगत महाराष्ट्र उपक्रम, अध्यापन, गाव पंजीका, शाळा विकास आराखडा, शिष्यवृत्ती परीक्षा इत्यादी बाबींचा विचार करता आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्‍यता आहे. हे काम करण्यासाठी सरकारच्या इतर आस्थापनांना सहभागी न करता शिक्षकांना हे काम दिले जात आहे. याविरोधात माणगाव तालुक्‍यातील १३८ प्राथमिक शिक्षकांनी हे काम नाकारले आहे. या सर्व शिक्षकांनी स्वसाक्षांकित केलेले पत्र माणगाव तहसीलदारांना दिले आहे.

शाळेवर नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या सेवा त्यांच्या मूळ अध्यापन कार्याऐवजी इतर शाळाबाह्य कामासाठी वापरणे अनुचित आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया व जनगणना इतर कोणत्याही प्रयोजनार्थ शिक्षकांच्या सेवा वापरण्यात येऊ नयेत.
- उदय गायकवाड, अध्यक्ष-माणगाव तालुका शिक्षक समन्वय समिती

ऑनलाईन कामाला सर्व शिक्षकांचा विरोध आहे. या कामासाठी इतर आस्थापनांना सहभागी न करता फक्त शिक्षकांना हे काम दिले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व शिक्षकांनी या कामाला विरोध केला आहे.
- नीलेश साळवी, राजिप प्राथमिक शिक्षक

अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक उपलब्ध नसून, अशा शाळाबाह्य कामांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.
- सखाराम कदम, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, माणगाव तालुका सचिव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boycott on Online work of Teachers in Mangao