कल्याणमधील रिंगरोड प्रकल्पाला ब्रेक 

कल्याणमधील रिंगरोड प्रकल्पाला ब्रेक 

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंगरोड प्रकल्पाला कल्याण शहरातच ब्रेक लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पाचा चौथा टप्पा दुर्गामाता चौकापासून सुरू होत आहे. याच ठिकाणी महापालिकेचे आधारवाडी क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राऊंड) आहे. हे ग्राऊंड बंद करण्यात महापालिकेला यश मिळालेले नसल्याने रिंगरोड प्रकल्पाच्या सुरुवातीच्या भागाचे काम प्रलंबित राहणार आहे. पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांशी बोलताना आयुक्तांनी पालिकेत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला, त्यावेळी ही बाब स्पष्ट झाली आहे. 

एप्रिल 2017 मध्ये सौराष्ट्र इन्व्हायरो प्रोजेक्‍टस्‌ प्रा. लि. या संस्थेला पालिकेने आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठीचा ठेका दिला. तीन वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु पालिकेला आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला पर्याय म्हणून इतरत्र प्रकल्प उभे करण्यास अपयश आल्याने आजही शहरातील कचरा याच ठिकाणी टाकला जातो. या कंपनीच्या कामाचा कालावधी एप्रिल 2020 मध्ये संपत आहे. परंतु पालिकेने काम करण्यासाठी ठेकेदाराला जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे या कामाला आवश्‍यक ती गती मिळू शकलेली नाही. या विषयात पालिका आता काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. 

दरम्यान उच्च न्यायालयाकडे जनहित याचिकेनुसार हे डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्तरित्या बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यासाठी पालिकेने तब्बल दहा वेळा निविदा मागवल्या होत्या. ठेकेदाराने अभियांत्रिकी नकाशे, आराखडे तयार केले आहेत. परंतु डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रणा बसवण्यासाठी पालीकेकडे मालकीची पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने ही यंत्रणा बसवण्यास विलंब झाला.

फेब्रुवारी 2018 मध्ये नियोजित रस्त्याच्या जागेमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटदाराला जागा उपलब्ध करून देण्यात आली. तेथे कचरा विलगीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. तीन महिन्यात ठेकेदाराने नऊ हजार घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया केली होती. परंतु दैनंदिन कचरा याच ठिकाणी पडत असल्याने ठेकेदाराच्या कामात अडथळे येत होते. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला सक्षम पर्याय उपलब्ध केल्याशिवाय हे डंपिंग ग्राउंड शास्त्रोक्त रित्या बंद करण्याचे काम शक्‍य नसल्याचे निदर्शनास आल्याने इतर प्रकल्पांकडे अधिक लक्ष देण्याचे पालिका प्रशासनाने निश्‍चित केले. 

भूसंपादन 80 टक्के पूर्ण 
आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडचा विषय प्राधान्यतत्त्वाने सोडवण्यात पालिकेला अपयश आले आहे. याच्या परिणामी रिंगरोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या सुरुवातीलाच कामात अडथळे उभे राहिले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) हा प्रकल्प राबविला जात असून टप्पा क्रमांक चार ते सात या कामाचे कार्यादेश दिले गेले आहे. संबंधित ठेकेदार यांनी येथे कामाची सुरुवातही केली आहे. पालिकेने भूसंपादन प्रक्रिया ही 80 टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण केली आहे. मात्र आधारवाडीमधून जाणाऱ्या रस्त्याचे काम हे डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्याशिवाय सुरू होणार नाही हे निश्‍चित आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com