Breast Cancer: काळजी घ्या! तरूणींमध्ये वाढतंय ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण

Breast Cancer: काळजी घ्या! तरूणींमध्ये वाढतंय ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण

मुंबई:  भारतात ब्रेस्ट कॅन्सरचे वाढते प्रमाण हे चिंतेचे कारण ठरत आहे. महिलांमधील सर्व प्रकारच्या कर्करोगांमध्ये 25-32 टक्के इतके प्रमाण असलेला ब्रेस्ट कॅन्सर शहरी महिलांमध्ये अगदी सामान्यपणे आढळून येत आहे. महत्वाचे म्हणजे चाळीशीत या आजाराचे वाढते प्रमाण हे चिंतेचे कारण आहे. 

ब्रेस्ट कॅन्सर हा भारतीय महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग ठरत आहे. दर चार मिनिटाला या आजाराचा एक नवा रुग्ण सापडतो आणि दर 13 व्या मिनिटाला एका महिलेचा ब्रेस्ट कॅन्सरने मृत्यू होतो. आकडेवारीनुसार, भारतातील दर 22 पैकी एका महिलेला आयुष्यात कधीतरी ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते. 2025 पर्यंत ब्रेस्ट कॅन्सरचा हा धोका आणखी 26 टक्क्यांनी वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार असला तरी भारतात ब्रेस्ट कॅन्सरचे वेळेत निदान करण्यात बिलंब केला जातो.उपचार करण्यात टाळाटाळ केली जाते. ब्रेस्ट कॅन्सरच्या जवळपास 60 टक्के रुग्णांचे निदान फार पुढच्या टप्प्यात होते आणि त्यामुळे मृत्यूदरही वाढतो.

पाश्चिमात्य देशात 'यंग ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच तरुणांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत अवघे 2-3 टक्के आहे. तर, भारतासारख्या आशियाई देशांमध्ये हे प्रमाण 10-20 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. दोन दशकांपूर्वी, 50 वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या महिलांचे प्रमाण 70 टक्क्यांहून अधिक होते. आता मात्र सुमारे 50 टक्के रुग्ण हे 50 वर्षाखालील आहेत. 25-40 या वयोगटातील महिलांमधील वाढते प्रमाण ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे.

वयस्कर रुग्णांमधील आजारांशी तुलना करता या कर्करोगांची कारणे बहुतांश अनुवांशिक जडणघडणीत सापडतात. उपचारानंतरही यंग ब्रेस्ट कॅन्सरमधून बचावलेल्या रुग्णांना अॅमनोरिया, वंध्यत्व आणि इतर अनेक सामाजिक-मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. कर्करोगाशी लढा देताना रुग्णावर मानसिक परिणाम देखील होत असून त्यामुळे भावनिक असमतोल, उदासीनता, ताण, आत्मविश्वास गमावणे यासाठी सातत्याने कॉन्सिलिंग करावे लागते. उपचारांमुळे लैंगिक समस्या निर्माण होत असल्याने लैंगिक मार्गदर्शन ही करावे लागते.

यंग ब्रेस्ट कॅन्सरच्या या गंभीर आजाराशी सामना करण्यासाठी अनुवांशिक पार्श्वभूमी असलेल्या महिलांना शोधणे आणि त्यांना जेनेटिक कॉन्सिलिंग देऊ करणे आवश्यक असल्याचे नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्जिकल ऑकॉलॉजी प्रमुख डॉ. संजय दुधाट यांनी सांगितले. 

अधिक धोका असलेल्यांसाठी सोनो-मॅमोग्राफी आणि एमआरआर मॅमोग्राफीच्या माध्यमातून चाचण्यांचे प्रमाण वाढवणेही गरजेचे आहे. तरुण वयात आजाराची अचूक चाचणी काहीशी कठीण ठरते. त्यामुळे 20 व्या वर्षापासूनच सेल्फ-ब्रेस्ट एक्झामिनेशन बद्दल जागरुकता निर्माण करायला हवी असे ही डॉ दुधाट यांनी सांगितले. सर्वच तरुण महिलांनी महिन्यातून एकदा, विशेषत: मासिक पाळीच्या पाच दिवसांनंतर तपासणी केल्यास स्तनांमध्ये कोणत्याही प्रकारची असामान्यता किंवा आजाराची लक्षण असल्यास ती फार आधीच्या टप्प्यावर लक्षात येतील आणि त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकेल असे ही डॉ दुधाट यांनी सुचवले.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Breast cancer Increasing incidence young girls

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com