ठाणे जिल्ह्यातील वीटभट्टी व्यवसाय लांबणीवर

रवींद्र घोडविंदे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकरी खरीप हंगामांनतर शेतीला जोडधंदा म्हणून वीटभट्टीचा व्यवसाय करतात. यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याचा फटका खरीप हंगामास जसा बसला तसाच तो ग्रामीण भागातील वीटभट्टी व्यवसायलाही बसण्याची शक्‍यता आहे. लांबणीवर गेलेल्या व्यवसायामुळे त्यावर मोलमजुरी करणाऱ्या गरीब आदिवासी शेतमजुरांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यातच आधीच भातशेतीच्या नुकसानाने हवालदिल झालेला बळीराजाही वीटभट्टीचा व्यवसाय करू की नको, या मनस्थितीत सापडला आहे. 

टिटवाळा : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकरी खरीप हंगामांनतर शेतीला जोडधंदा म्हणून वीटभट्टीचा व्यवसाय करतात. यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याचा फटका खरीप हंगामास जसा बसला तसाच तो ग्रामीण भागातील वीटभट्टी व्यवसायलाही बसण्याची शक्‍यता आहे. लांबणीवर गेलेल्या व्यवसायामुळे त्यावर मोलमजुरी करणाऱ्या गरीब आदिवासी शेतमजुरांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यातच आधीच भातशेतीच्या नुकसानाने हवालदिल झालेला बळीराजाही वीटभट्टीचा व्यवसाय करू की नको, या मनस्थितीत सापडला आहे. 

ठाणे जिल्ह्यात, कल्याण, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आदी तालुक्‍यात दीड हजाराहून अधिक वीटभट्टी मालक आहेत. या वीटभट्टीत आठ ते दहा हजार कामगार काम करत असतात. यावर्षी अद्याप वीटभट्ट्या सुरू न झाल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या मजूर कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्‍यता आहे. पावसाळा संपल्यानंतर आदिवासी बांधव या व्यवसायावर आपली उपजीविका करतात. त्यातून आठ महिने रोजगार या बाधवांना मिळतो. मात्र यावर्षी पाऊस लांबल्याने शिवाय नोव्हेंबर उलटत आला तरी वीटभट्टी मालक व्यवसाय सुरू करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

परतीच्या पावसाचे चिन्ह अद्यापी दिसत असल्यामुळे वीटभट्टी व्यवसाय दरवर्षीपेक्षा उशीरा सुरू होणार आहे. तोपर्यंत आम्ही जगायचे कसे, हाच प्रश्न आहे. त्यामुळे हजारो आदिवासी बांधवांचे आर्थिक नुकसान होत आहे. 
- किसन वाघे, 
आदिवासी कामगार 

शेतीचे झालेले नुकसान पाहता जोडधंदा म्हणून असलेल्या वीट भट्टी व्यवसायाला सुरुवात करायची की नाही, या विवंचनेत वीट उत्पादक मालक आहेत. हल्ली पावसाचा काही भरवसा नाही. अवकाळी पाऊस पडला तर तयार होणारा कच्चा माल भिजेल आणि पुन्हा नुकसान. यामुळे हा व्यवसाय सुरू करायचा की नाही, या विवंचनेत आम्ही आहोत, 
शांताराम भोईर, 
वीटभट्टी मालक 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brick kiln business in Thane district prolonged