मोठ्या पगाराची नोकरी सोडून तो देतोय प्लॅस्टिकमु्क्त भारताचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सिंगल युज प्लास्टिकमुक्त भारत अभियाना'ची प्रेरणा घेऊन मध्य प्रदेशातील मुरैना येथील ब्रिजेश शर्मा हा युवक भारत भ्रमणासाठी सायकलवरून निघाला आहे.

शहापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सिंगल युज प्लास्टिकमुक्त भारत अभियाना'ची प्रेरणा घेऊन मध्य प्रदेशातील मुरैना येथील ब्रिजेश शर्मा हा युवक भारत भ्रमणासाठी सायकलवरून निघाला आहे. या तरुणाने शहापूर येथे भेट देऊन नागरिकांना प्लास्टिकमुक्त राहण्याचा संदेश दिला. या अभियानासाठी तो भारतात प्लास्टिक न वापरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करतो. 

ब्रिजेश शर्मा भारतभर 11 हजार 500 किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण करणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीतील नोकरी सोडून ब्रिजेश शर्मा याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवशी 17 सप्टेंबर 2019 रोजी गुजरातमधील गांधीनगरपासून सायकल यात्रा सुरू केली. गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आता महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक असा प्रवास करत तो शहापूरमध्ये पोहोचला. प्रवासात त्याने सहा राज्यातील नागरिकांना भारतात प्लास्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल जनजागृती केली. 

ही बातमी वाचा ः मराठी भाषा भाकरीची भाषा बनावी -सबनीस

शाळा, महाविद्यालयातील चार लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांशी त्याने आत्तापर्यंत संवाद साधला. सर्वांना प्लास्टिकच्या दुष्परिणामाची माहिती देत आहे. ब्रिजेश शर्मा याचे शहापूर येथे आगमन झाले असता भाजप शहापूर शहरतर्फे त्याचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी भाजप शहापूर शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर, ज्येष्ठ नेते इरणक, देवेंद्र शहा; तसेच व्यापारी आघाडी शहापूर शहराचे अध्यक्ष किशोर अग्रवाल, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष साजिद शेख, शहापूर शहर पदाधिकारी शिवाजी लिमये, जयवंत जोशी, जतीन दवे, अनिकेत पष्टे आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brijesh Sharma tours India on a bicycle for plastic release