Mumbai News : मुलीचा जीव गेला अन आश्वासनेही वाऱ्यावर!

हिंगणघाटमधील जळीतकांड! पाच वर्षांनंतरही पीडितेच्या कुटुंबाची मदतीसाठी याचना
fire
fireSakal
Updated on

मुंबई - हिंगणघाट (जि.वर्धा) येथून शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेवर विकी नगराळे या तरुणाने पेट्रोल टाकून तिला जाळल्याच्या घटनेने राज्य हादरले होते. ही हृदयद्रावक घटना ३ फेब्रुवारी २०२० रोजी घडली होती. मरणाशी झुंजणाऱ्या पीडितेने ८ फेब्रुवारीला रोजी जीव सोडला. पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यासाठी त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांची चढाओढ लागली होती. प्रत्यक्षात घटनेनंतर तीन वर्षांनी म्हणजे २०२३ मध्ये पाच लाख रुपये देऊन बोळवण करण्यात आली. पण सरकारी नोकरीच्या आश्वासनाकडे सरकारने सोयीने मौन बाळगले आहे.

पीडितेच्या मागे आई, वडील आणि एक लहान भाऊ आहे. महिला अत्याचारातील पीडितेला किंवा तिच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांपर्यंत मदत केली जाते. प्रत्यक्षात या घटनेत पीडितेच्या कुटुंबाला केवळ पाच लाख रुपयेच मिळाले. मुलाच्या सरकारी नोकरीबाबत कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न तिच्या वडिलांना पडला आहे. ‘सकाळ’शी दूरध्वनीवरुन बोलताना ते म्हणाले, की या घटनेनंतर अनेकांनी आश्वासने दिली. पण पूर्ण करण्यासाठी कोणी पुढे येत नाही.

२०२३ मध्ये नागपूर अधिवेशनाच्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: बोलावून पाच लाख रुपये दिले होते. तेव्हा पैशापेक्षा आमच्या मुलाला सरकारी नोकरी द्या, अशी मागणी मी त्यांच्याकडे केली होती. माझी पत्नी सतत आजारी असते. मुलीच्या मृत्यूने ती पूर्ण खचली आहे. त्यामुळे मुलाला दूर कामाला पाठवायला ती तयार नाही. मुलगा बी. टेक. आहे. खासगी कंपनीत आहे. त्याला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन फडणवीस यांनीही दिल्याची आठवण त्यांनी करून दिली.

या कुटुंबाला आधार देण्यासाठी आर्थिक मदत आणि मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांनी दिले होते. पीडितेचा भाऊ अभियंता झाला तेव्हा विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुलाच्या नोकरीचे आश्वासन पूर्ण करण्याची मागणी सभागृहात केली होती. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री होते. त्यांनी २०२३ मध्ये या कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली. त्याच वेळी मुलाच्या नोकरीचे पुन्हा आश्वासन दिले होते.

घटनेचा तपशील:

  • आरोपी विकी नगराळे हा पीडितेवर एकतर्फी प्रेम करीत होता.

  • पीडितेने त्याच्या प्रस्तावाला नकार दिला, त्यामुळे आरोपीने तिच्यावर सूड उगवण्याच्या हेतूने हा क्रूर प्रकार केला.

  • पीडिता ३ 3 फेब्रुवारी२०२० रोजी शाळेत जात असताना विकीने तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

  • गंभीर भाजल्यामुळे तिला नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले

  • ८ फेब्रुवारी २०२० रोजी तिचा मृत्यू झाला.

सामाजिक परिणाम

  • या घटनेनंतर महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी झाली

  • महिलांसाठी स्वरक्षण प्रशिक्षण, तक्रार नोंदणी सुलभ करणे आणि कठोर कायद्यांची अंमलबजावणी यावर भर देण्यात आला

  • शिक्षिकेला श्रद्धांजली म्हणून तिच्या गावात स्मारक उभारण्याचा निर्णय झाला

आरोपीवर कारवाई

  • घटनेनंतर आरोपी विकी नगराळेला अटक

  • जळीतकांडाचा हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात आला

  • वर्धा सत्र न्यायालयाने ७ डिसेंबर २०२१ रोजी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली

  • मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२३ रोजी दिलेल्या निकालात नगराळेची फाशीची शिक्षा कायम ठेवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com