....अखेर मासेखाऊ बचावला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 मार्च 2020

मासेखाऊ तपकिरी घुबड जखमी दिसल्यानंतर काही जागरूक नागरिकांनी डॉ. आदित्य महामुणकर यांच्याकडे सुपूर्द केले. सीस्केप टीम आणि वन विभाग कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले.

महाड : वीजवाहिनीचा धक्का लागल्याने जखमी झालेल्या मासेखाऊ तपकिरी घुबडाला "सिस्केप' संस्थेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी नुकतेच गुरुवारी जीवदान दिले. घुबडाच्या 200 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. त्यापैकी हे घुबड अतिधोक्‍यात आलेल्या वन्यजीवांपैकी एक आहे. 

धक्कादायक : गुलाबी मैना गावावर राहिली

मासेखाऊ तपकिरी घुबड जखमी दिसल्यानंतर काही जागरूक नागरिकांनी डॉ. आदित्य महामुणकर यांच्याकडे सुपूर्द केले. सीस्केप टीम आणि वन विभाग कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. 
महाड परिसरात यापूर्वी गव्हाणी घुबड, स्पॉंटेड आऊलेटस्‌, स्कॉंप्स आऊल, ग्रास आऊल या छोट्या आणि मध्यम आकाराच्या घुबडांची नोंद "सीस्केप'ने केली आहे, अशी माहिती महाड वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे यांच्यासह संस्थेचे प्रकल्पप्रमुख योगेश गुरव, प्रणव कुलकर्णी, अनुराग मोरे, चिंतन वैष्णव, चिराग मेहता, ओम शिंदे यांनी दिली. 

"प्राणी बचाव'ची आवश्‍यकता 
महाड परिसरात मगर, साप, खवले मांजर, सरीसृप, साळिंदर, भेकर, चौशिंगा, नीलगाय, मोर, बिबट्याची पिल्ले आदी अनेक पक्षी-प्राणी जखमी अवस्थेत सापडले होते. गिधाडाच्या प्रजातीसुद्धा महाड, म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव, पोलादपूर, रायगड किल्ला परिसर मरणासन्न अवस्थेत सापडल्यावर "सिस्केप' आणि वन विभागाकडून त्यांची योग्य ती शिश्रूषा केल्याची नोंद आहे. त्यामुळे प्राणीबचाव आणि पुनर्वसन केंद्राची आवश्‍यकता आहे, असे सिस्केपचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brown owl injured