काकून बदक, गुलाबी मैना गावावर राहिली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 मार्च 2020

समुद्र किनाऱ्यांबरोबरच डोंगर भाग आणि गोड्या पाणथळ भागात हिवाळ्यात येणाऱ्या पक्ष्यांमध्ये मुख्यत्वे काकून बदक, चक्रांग बदक, करड्या मानेचा भरीट, हुडहुड, तास पक्षी, तुरेवाला भरीट (युवराज), निळकंठ, सामान्य खरुची यांचा समावेश असतो. यात काकून बदक, करड्या मानेचा भरीट, तुरेवाला भरीट, युरोपियन तास, गुलाबी मैना हे यंदा अजिबात दिसले नाहीत.

रोहा : वातावरणातील बदलांचा परिणाम रायगड जिल्ह्यातील जैवविविधतेवर झाला आहे. विशेषत: काही स्थलांतरित पक्ष्यांनाही त्याचा फटका बसला असून काकून बदक, करड्या मानेचा भरीट हे दिसलेच नाहीत; तर काही पक्षी खूपच कमी संख्येने दृष्टीस पडले, असे निरीक्षण पक्षीतज्ज्ञांनी नोंदवले आहे. काही दिवसांपूर्वी सीगल यंदा लवकरच परतीच्या प्रवासाला निघाल्याची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांबरोबरच डोंगर भाग आणि गोड्या पाणथळ भागात हिवाळ्यात येणाऱ्या पक्ष्यांमध्ये मुख्यत्वे काकून बदक, चक्रांग बदक, करड्या मानेचा भरीट, हुडहुड, तास पक्षी, तुरेवाला भरीट (युवराज), निळकंठ, सामान्य खरुची यांचा समावेश असतो. यात काकून बदक, करड्या मानेचा भरीट, तुरेवाला भरीट, युरोपियन तास, गुलाबी मैना हे यंदा अजिबात दिसले नाहीत; तर सगळ्या प्रकारचे तुतारी पक्षी, हुडहुड, नीलकंठ, सामान्य खरुची, कंठवला होला आणि येथील मूळचे असलेले अडई बदक यांचे प्रमाण 20 ते 30 टक्केच दिसून आले; तर धोबी पक्ष्यांची संख्या नेहमीप्रमाणे चांगली होती, अशी माहिती पक्षी निरीक्षक शंतनू कुवेस्कर यांनी दिली. 

हे वाचा : काेराेनाबराेबर लढण्यासाठी महाराष्ट्र सज्ज

कोकण परिसरात दरवर्षी हिवाळ्याच्या मोसमात अनेक परदेशी पाहुणे दाखल होतात; परंतु या वर्षी त्यांच्या स्थलांतरामध्ये आश्‍चर्यकारक घट झाल्याचे दिसून येत आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला काही "पॅसेज मायग्रंट' म्हणजेच लांब पल्ल्याच्या स्थलांतरादरम्यान काही काळ विश्रांती घेण्यासाठी उतरणारे पक्षी असतात. या वर्षी कोकण पट्ट्यात त्यातील एकही पक्षी नजरेस पडला नाही. स्थलांतरित पक्षी सोडून कोकणात येथील मूळच्या असलेल्या पक्ष्यांच्या संख्येमध्येदेखील मोठी घट दिसून येत आहे, ही मोठी चिंताजनक बाब आहे. अतिवृष्टीमुळे गेल्या वर्षी येथील काही मूळच्या पक्ष्यांचे प्रजनन प्रक्रियाचक्र बिघडल्याचे दिसून आले होते. काही मोजके पक्षी सोडल्यास इतर सर्वसाधारण आढळून येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येमध्येदेखील कोकणात मोठी घट दिसून येत आहे. एक तर या पक्ष्यांनी कोकणपट्टा सोडून इतरत्र स्थानिक स्थलांतर केल्याची शक्‍यता आहे असेही त्यांनी सांगितले. 

निसर्गातील घटनाक्रमात कमालीचे बदल जाणवत आहेत. ऋतुमान बदलत आहे. काटेसावर, पळस ही नोव्हेंबर, डिसेंबरदरम्यान फुलणारी झाडे फेब्रुवारी, मार्चमध्ये फुलू लागली. त्यामुळे त्यावर अवलंबून पक्षी, कीटक उशिराने आले किंवा आलेच नाहीत. या छोट्या पक्ष्यांचा अन्न म्हणून वापर करणारे मोठे पक्षीही दिसून आले नाहीत. आखाती देशातून कोकणात येणारा स्पॅलेट स्कॉप्स घुबड या वर्षी अजिबात दिसून आला नाही, अशी माहिती निसर्गमित्र अक्षय खरे यांनी दिली. 

गतवर्षी सर्वत्रच जास्त पाऊस झाला. त्यामुळे जेथे पाणी उपलब्ध नव्हते, तेथे पाणीसाठा निर्माण झाला. अशा प्रदेशात सर्वत्र पक्ष्यांच्या हालचालींची नोंद चांगल्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अंतर्देशीय स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांचा मुख्य कल कोकणपट्टा सोडून अधिक पूर्वेकडील भाग असल्याची शक्‍यता आहे. 
- तुषार पाटील, पक्षीप्रेमी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Climate change has impacted the biodiversity of Raigad district.