मुलुंडमधील अ‍ॅपेक्स हॉस्पिटलचं होणार ऑडिट, आग प्रकरणानंतर समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे चौकशी

संजीव देशपांडे
Saturday, 17 October 2020

सोमवारी सायंकाळी ६:३० वाजता अ‍ॅपेक्स हॉस्पिटलमध्ये जनरेटरच्या खोलीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

मुंबई, मुलुंडमधील अ‍ॅपेक्स कोव्हिड हॉस्पिटलला सोमवारी मुंबईची बत्तीगुल झाल्याचा मोठा फटका बसला. जनरेटरला आग लागल्यामुळे उपचारासाठी दुसरीकडे हलवताना एकूण दोन कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यूही झाला. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे एका ८२ वर्षीय गंभीर कोव्हिड पेशंटचा मृत्यू झाला असं बोललं जातं तर त्यानंतर बुधवारी सकाळी ५५ वर्षीय वीरेंद्र सिंग यांचा फोर्टिस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. हा रुग्ण ॲपेक्स रुग्णालयात उपचार घेत होता.

सोमवारी सायंकाळी ६:३० वाजता अ‍ॅपेक्स हॉस्पिटलमध्ये जनरेटरच्या खोलीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांमध्ये गदारोळ झाला. लवकरच हॉस्पिटलने 40 कोविड रूग्णांना जवळच्या रुग्णालयात हलविले. तथापि, इतरत्र दाखल केलेल्या  रूग्णांपैकी बर्‍याच रूग्णांची प्रकृती गंभीर होती. अ‍ॅपेक्स रुग्णालय प्रशासनाने सिंग कुटुंबला वीरेंद्र यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल केल्याबद्दलची माहिती दिली नाही. परिणामी वीरेंद्र सिंगच्या कुटुंबीयांनी मुलुंडमधील सर्व कोव्हिड सेंटरमध्ये त्यांच्या शोध घेतला. एका दिवसाच्या शोधाशोधनंतर सिंग कुटुंबियांना वीरेंद्र मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात सापडले. हे कुटुंब आनंदी झाले आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. परंतु त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला.

बुधवारी पहाटे (ता. 13 ऑक्टोबर) चारच्या सुमारास वीरेंद्र सिंग कोरोनाच्या लढ्यात अपयशी ठरले. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे चिडून आलेले मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी रुग्णालयात दुर्लक्ष केल्याचा आणि रूग्णांवर जास्त प्रमाणात बिल आकारल्याचा आरोप लावून रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याची मागणी महापालिकेकडे केली. विशेष म्हणजे, पालिकेने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत रुग्णालयाचे ‘ऑडिट’ सुरू केले आहे. महानगरपालिकेने आदेश दिले आहेत की ऑडिट पूर्ण होईपर्यंत ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये कोणत्याही कोव्हिड-19 रूग्णाला दाखल केले जाणार नाही.

महत्त्वाची बातमी : पुराच्या पाण्याने जीवघेण्या लेप्टो संसर्गाचा धोका, कशी होते लागण आणि कशी घ्याल काळजी, जाणून घ्या

अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या दुर्लक्षावर हल्ला चढवत मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले की, “गेल्या सहा महिन्यांपासून मला अ‍ॅपेक्स हॉस्पिटलविरूद्ध वाढिव बिल आणि रुग्णांकडे दुर्लक्ष झाल्याच्या संदर्भात बर्‍याच तक्रारी आल्या आहेत.

वीरेंद्र सिंगच्या पालकांनी मला सांगितले की त्यांच्या मुलाची मेडिक्लेम पॉलिसी असूनही रूग्णालयाने त्यांच्याकडून आगाऊ रक्कम घेतली. त्याशिवाय त्यांचा मुलगा वीरेंद्र सिंग ह्याला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलविण्याबद्दल ॲपेक्स रुग्णालयाने सिंग कुटुंबाला माहिती दिली नाही. त्यामुहले रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला. असे दिसते आहे की ॲपेक्स हॉस्पिटल हे हॉस्पिटलपेक्षा बिझिनेस हाऊस बनले आहे. प्रत्येक रूग्णाला ३-४ लाख रूपयांचे बिल आकारले जात आहे.रुग्णालयाचे ऑडिट करण्यासाठी मी अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि आरोग्य विभागाला पत्र लिहिले आहे. ऑडिट पूर्ण होईपर्यंत अ‍ॅपेक्स रुग्णालय बंदच राहिले पाहिजे. पुढे तपासणीत जर रुग्णालयाची चुक असल्याचे आढळून आले तर रुग्णालयला कायमचा ताळा ठोकला पाहिजे", असंही आमदार म्हणालेत. 

bruhanmumbai municipal corporation to conduct audit of apex hospital mulund


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bruhanmumbai municipal corporation to conduct audit of apex hospital mulund