पिवळ्या बेडकांची वसईत डराव डराव; लॉकडाऊनमध्येही भरली अनोखी शाळा...

प्रसाद जोशी
Sunday, 5 July 2020

सिमेंट-काँक्रिटीकरणाचे जंगल वसईत वाढत असले तरी मात्र हिरवळ जपण्यासाठी पश्चिम पट्ट्यात प्रयत्न केला जात आहे. ग्रामीण भागात वर्षभर शांत असलेले बेडूक पावसाळ्यात मात्र जमिनीवर येतात.

वसई : वेधशाळा येण्यापूर्वी पंचांगावरून पावसाचा अंदाज वर्तवला जायचा आणि प्रत्येक पर्जन्यनक्षत्राच्या वाहनांना फार महत्त्व होते. बेडूक त्यांपैकीच एक वाहन. पाऊस सुरू होताच हमखास बेडुक दिसतात. सध्या वसईच्या भातशेतीमध्ये पिवळ्या बेडकांची (बुल फ्रॉग) भरलेली शाळा वसईकरांसाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे. वसईच्या नवाळे गावातील वर्तक वाडीमधील विशाल वर्तक यांच्या शेतात दुर्मिळ प्रजाती असलेल्या पाच-पन्नास बुल फ्रॉगची रोज मनसोक्त डराव डराव सुरू आहे.

'वारांच्या गुगलीने' मांसाहारी खवय्यांचा हिरमोड; रविवारी गुरुपौर्णिमा तर बुधवारी संकष्टी...

प्राणिशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार पिवळ्या बेडकांचे मुख्य भक्ष्य कीटक आहे. बुल फ्रॉग नावाने असे बेडूक ओळखले जातात. ग्रामीण भागात पहिल्या पावसानंतर ते नजरेस पडतात. वसईतील त्यांचा वावर प्राणिमित्रांसाठी सुखावणारा आहे. त्यांच्या पायात मोठी ताकद असते. लांब उडी मारून भक्ष्य पकडण्यासाठी त्याचा फायदा होतो. कीटकांपासून भातशेतीचा बचाव करण्यासाठी बेडूक एकप्रकारे शेतकऱ्यांची मदत करत असतात. पावसाळा म्हणजे बुल फ्रॉगचा प्रजनन काळ असतो. प्रजनन काळात नर पिवळा रंग घेतो. मादी राखाडी रंगाची असते. जन्माला आलेले बेडूक सोडून नर-मादी पुढे निघून जातात, अशी माहिती प्राणिशास्त्र अभ्यासक प्रा. अभय हुले यांनी दिली.

एसटी महामंडळात तब्बल 'इतक्या' कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; एसटीच्या मुख्य कामगार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष..

सिमेंट-काँक्रिटीकरणाचे जंगल वसईत वाढत असले तरी मात्र हिरवळ जपण्यासाठी पश्चिम पट्ट्यात प्रयत्न केला जात आहे. ग्रामीण भागात वर्षभर शांत असलेले बेडूक पावसाळ्यात मात्र जमिनीवर येतात. वसईत बावखले मोठ्या प्रमाणात आहेत. त्या ठिकाणी तसेच शेतजमिनीवर बेडकांचा अधिवास असतो. लॉकडाऊनमध्ये शाळा-महाविद्यालये बंद असली तरी पिवळ्या बेडकांची भरलेली शाळा लक्ष वेधून घेत आहे.

"मै लष्कर ए तोयबा से सुलतान बोल रहा हूँ"; ताज हॉटेलला आले धमकीचे २ फोन..पोलिसांनी केला गुन्हा दाखल..

आमच्या घराच्या मागच्या बाजूस आम्ही भाजीपाल्याची लागवड करतो. पावसाळ्यात भातशेती लावतो. शेतात जवळपास 50-60 पिवळ्या बेडकांची डराव डराव रोजच सुरू आहे. आम्ही पहिल्यांदाच पिवळ्या रंगाचे एवढे बेडूक एकत्र पाहिले, असे शेतकरी विशाल व राजेश वर्तक यांनी सांगितले.

चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री कोरोना पॉझिटीव्ह; तातडीने थांबविले चित्रीकरण....

गोवा , कोकण आदी भागांत पिवळे बेडूक आढळतात. वसईत ते कुठे आढळले त्याची माहिती संकलन करून त्यांचा अधिवास जपण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांखाली अनेक बेडूक चिरडले जातात. शेतकऱ्यांना फायदेशीर असलेले बेडूक दुर्मिळ होत आहेत.
- प्रा. अभय हुले, प्राणिशास्त्र अभ्यासक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bull frog came to see in vasai area amid rainy season started