"मै लष्कर ए तोयबा से सुलतान बोल रहा हूँ"; ताज हॉटेलला आले धमकीचे २ फोन..पोलिसांनी केला गुन्हा दाखल..

 सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

कुलाबा येथील प्रसिद्ध ताज महल पॅलेसवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणा-या कथीत लष्कर ए तोयबाच्या हस्तकाने चार मिनीटांच्या अंतराने दोन दूरध्वनी केले होते.

मुंबई: कुलाबा येथील प्रसिद्ध ताज महल पॅलेसवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणा-या कथीत लष्कर ए तोयबाच्या हस्तकाने चार मिनीटांच्या अंतराने दोन दूरध्वनी केले होते. याप्रकरणी आता कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने खोडसाळपणातून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

ताज महल पॅलेसच्या फ्रंट ऑफिसमध्ये 30 जुलै मध्यरात्री 12 वाजून 35 मिनीटांनी  प्रथम धमकीचा दूरध्वनी आला होता.  मै लष्कर ए तोयबा से बोल रहा हु मेरा नाम सुलतान है असे बोलुन दूरध्वनी कट केला. त्यामुळे घाबरलेल्या टेलिफोन ऑपरेटर हा सर्व प्रकार तेथे सुरक्षेसाठी तैनात ताजच्या खाजगी सुरक्षा विभागाला सांगितला. त्यानंतर चार मिनिटांनी पुन्हा त्याच मोबाईल क्रमांकावरून पुन्हा दूरध्वनी आला.

हेही वाचा: उच्चशिक्षित तरुणाकडून लग्नाच्या बहाण्यानं तब्बल १६ तरुणींची फसवणूक

त्यामुळे हा दूरध्वनी एक्सटेन्शनच्या सहाय्याने सुरक्षा एक्झिक्युटीव्हला जोडण्यात आला. दूरध्वनी करणा-या व्यक्तीने  मै सुलतान बोल रहा हुँ.  मै लष्कर ए तोयबा से हुँ और मै पाकीस्तान से बोल रहा हुँ. हॉटेल ताज पे जो पहीले अॅटॅक हुआ था, वैसाही अॅटॅक हम फिर से करनेवाले है और हम इसकी प्लनिंग बहोत जल्द करनेवाले है, असे धमकावले. 

त्यावर सुरक्षा एक्झिक्युटीव्हने आपका पुरा नाम क्या है, असे विचारले असता मैने पहले ही कहाँ है की, मेरा नाम सुलतान है. मै लष्कर ए तोयबा से हूँ और मै पाकिस्तान से बेल रहा हूँ, असे बोलून त्याने दूरध्वनी कट केला. त्यानंतर या घटनेबाबत प्रभारी सुरक्षा रक्षकाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना या दूरध्वनीची माहिती देण्यात आली.

ताजच्या सुरक्षेत पोलिसांनी वाढ केल्यानंतर आता दूरध्वनीवर बोलणा-या सुरक्षा एक्झिक्युटीव्हचा जबाब पोलिसांनी नुकताच नोंदवला असून त्या जबाबाच्या सहाय्याने याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 505(1)(ब), 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणानंतर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

तरी प्राथमिक तपासात हा प्रकार खोडसाळपणातून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचा संशय असून संबंधीत दूरध्वनी क्रमांकाच्या सहाय्याने पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, ताजकडून प्रतिक्रिया जारी करण्यात आली होती. 

हेही वाचा: मुंबईतल्या 'या' भागात पाणी साचल्यास येथे तक्रार नोंदवा

त्यात या धमकीच्या दूरध्वनीनंतर आम्ही तात्काळ यंत्रणांना सतर्क केले आहे. याप्रकरणी आम्ही सर्व सुरक्षा यंत्रणांना सर्वतोपरी सहकार्य करत आहोत. आमची सुरक्षा व संरक्षण पथक सर्व नियमांचे पालन करून जीविताचे तसेच मालमत्तेची संरक्षण करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पुरेपूर उपाययोजना करण्यात आल्याचे आम्ही आमचे ग्राहक व सहका-यांना आश्वस्थ करू इच्छीत असल्याचे ताजच्या वतीने सांगण्यात आले. सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर ताज हॉटेलमध्ये केवळ पालिकेच्या विविध रुग्णालयातील डॉक्टर गेल्या तीन महिन्यांपासून राहत आहेत.

police filed FIR against caller who called at hotel taj 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police filed FIR against caller who called at hotel taj