Mumbai : चालकासह चाळीस प्रवाशांसाठी तो ठरला देवदूत

उदगीर आगाराच्या बसचालकास चालत्या बसमध्येच हृदयविकाराचा झटका.... दोलायमान बसमधील प्रवाशांचा एकच गलका.....
सुधीर राणे
सुधीर राणेSakal

करकंब : वेळ रात्री अकराच्या दरम्यानची.... उदगीर आगाराच्या बसचालकास चालत्या बसमध्येच हृदयविकाराचा झटका.... दोलायमान बसमधील प्रवाशांचा एकच गलका..... वेळीच 'त्याच्या'कडून बसच्या स्टेअरिंगचा ताबा..... हॅन्डब्रेकच्या सहाय्याने बसवर नियंत्रण.... आणि चालकासह बसमधील चाळीस प्रवाशांचा सुटकेचा निःश्वास!

हा थरार रविवारी रात्री (ता.८) उदगीर - वल्लभनगर ह्या बसमधील प्रवाशांनी 'याची देही याची डोळा' अनुभवला. उदगीर आगराच्या या बसमधून सुमारे चाळीस प्रवाशी प्रवास करत होते. याच बसमध्ये करकंब (ता.पंढरपूर) येथील सुधीर राणे हेही पुण्याला जाण्यासाठी टेंभुर्णी येथून रात्री साडेदहा वाजता बसमध्ये बसले. त्यानंतर तासाभरातच बस पळसदेव हद्दीत आली असता अचानक चालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते बसच्या स्टेरिंगवरच कोसळले. त्यामुळे बस झिगझाग पध्दतीने हेलकावे खात चालू लागली.

परिणामी अर्धवट झोपेत असलेल्या प्रवाशांना काही तरी झाल्याची जाणीव झाली आणि त्यांनी ओरडायला सुरुवात केली. त्यावेळी प्रसंगावधान राखत सदर बस मधून प्रवास करणारे करकंबचे रहिवासी सुधीर रणे यांनी प्रवाशांना बाजूला सारत बसच्या केबिनमध्ये शिरून स्टेरिंगचा ताबा घेतला आणि हॅन्ड ब्रेकचा वापर करून बस थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी कठड्यावर आदळून थांबली. विशेष म्हणजे हा प्रसंग घडला ती जागा उजनीच्या बॅक वॉटरची आहे. त्यामुळे बस थांबायला अजून काही क्षणाचा जरी अवधी लागला असता तर बस थेट ह्या उजनीच्या पाण्यात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. यावेळी सर्व प्रवाशांनी सुधीर रणे यांना देवदुता सारखे धावत येऊन आमचा जीव वाचवला असे म्हणत धन्यवाद दिले.

सुधीर रणे यांनीच बस नेली भिगवणला बस थांबून मोठा अनर्थ टळला असला तरी अजूनही बसचे चालक गोविंद सूर्यवंशी हे बेशुद्ध अवस्थेतच होते. तेव्हा सुधीर रणे यांनी चालकाला त्यांच्या सीट वरून उचलून इंजिनच्या बोनेटवर झोपवले आणि त्यांच्या छातीवर जोरजोरात दाब दिला. तेव्हा त्यांना थोडी शुद्ध आली. त्यानंतर रणे यांनी चालकास ताबडतोब दवाखान्यात न्यावे लागेल हे ओळखून रात्रीची वेळ असल्याने स्वतः बस चालवण्याची तयारी दर्शवली. परंतु वाहक संतोष गायकवाड यांनी पोलीस आणि रुग्णवाहिकेची वाट बघू असा कायदेशीर मार्ग सांगितला. परंतु तेवढा वेळ नसल्याने आणि स्वतःकडे ट्रॅव्हल चालवण्याचा अनुभव असल्याचे सांगत सर्व प्रवासी आणि वाहकाला विश्वास देत रणे यांनी स्वतः बस चालवून भिगवण पर्यंत आणली.

चालक सूर्यवंशी यांना तेथील खाजगी दवाखान्यात दाखल करून त्यांच्यावर उपचार चालू केले बस भिगवण येथील बस स्थानकात नेली. वाहकांनी सर्व प्रवाशांना इतर बसमध्ये बसवून पाठविले. त्यानंतर तासाभराने चालक सूर्यवंशी यांना शुद्ध आली. तेव्हा त्यांना घडलेल्या प्रकाराबद्दल काहीही माहित नव्हते. सुधीर रणेचा नाईलाजासत्व वल्लभनगर बसमधून प्रवास वास्तविक पाहता सुधीर रणे यांना मुंबईला जायचे असल्याने ते टेंभुर्णी येथून स्वारगेटला जाण्यासाठी निघाले होते. परंतु स्वारगेटला जाणाऱ्या सर्व बस फुल्ल येत असल्याने त्यांनी अनेक बस सोडून दिल्या होत्या. शेवटी उदगीर - वल्लभनगर बस मध्ये बसायला जागा मिळाल्याने ते शिवाजीनगर पर्यंत जाण्याच्या इराद्याने या बसमध्ये बसले आणि पुढे तासाभरातच त्यांच्या हातून चाळीस प्रवाशांचे जीव वाचविण्याचे पुण्यकर्म घडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com