आरे वृक्षतोड : आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मिलिंद तांबे
Thursday, 1 October 2020

आरेमधील मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या 29 आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती.

मुंबई : गेल्या वर्षी आरे येथे मेट्रोसाठी कापण्यात येणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावी अशी विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर सदस्यांनी देखील याला अनुमोदन दिले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे लगेच मागे घेण्याची कार्यवाही करावी असे निर्देश गृह विभागास दिले. त्यामुळे आरे प्रकरणी 29 आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे अखेर मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

आरेमधील मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या 29 आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. या आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला.यामुळे आंदोलकांनी आनंद व्यक्त करत या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबई महापालिकेत तिरंगी लढत होणार, भाजप वाढवणार शिवसेनेची अडचण ?

मेट्रो कारशेडसाठी 4 ऑक्टोबर ला रात्रीच्या वेळी वृक्षतोड सुरू असताना त्याला विरोध करायला गेलेल्या पर्यावरणप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी 29 जणांवर कलम 353 अन्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलेल्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रथम आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आणि त्यानंतर आरेतील 29 जणांवर दाखल केले गुन्हे मागे घेऊन पर्यावरणप्रेमींना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर पुढे त्यावर अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे गेल्याच आठवड्यात या आंदोलक विद्यार्थ्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली होती.

( संपादन - सुमित बागुल )

cabinet has decided to withdraw cases on the protestors at aarye last year


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cabinet has decided to withdraw cases on the protestors at aarye last year