
Mumbai News : रुग्णवाहिका चालकास मारहाण करणाऱ्या फेरिवाल्यांवर गुन्हा दाखल
डोंबिवली – डोंबिवलीतील मधुबन टॉकीज गल्लीत शुल्लक कारणावरून फेरीवाल्यांची रुग्णवाहिका चालक गणेश माळी याला गुरुवारी दुपारी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात रात्री उशारी गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश याच्या तक्रारीवरुन अशोक गुप्ता (वय 31) आणि रोहीत गुप्ता (वय 23) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेरिवाल्यांची मुजोरी वाढत असून पालिका प्रशासनासही हे फेरिवाले जुमानत नाहीत. मारहाणीच्या घटनेनंतर गल्लीतील फेरिवाल्यांवर पालिका प्रशासनाने कारवाई केल्याचे दिसून आले.
डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरात परप्रांतिय फेरिवाल्यांची संख्या जास्त आहे. या फेरिवाल्यांची एक लॉबी असून त्यांची दिवसेंदिवस दादागिरी वाढत आहे. पालिका अतिक्रमण विरोधी पथक कारवाईसाठी गेल्यास त्यांच्यावरही हल्ले करण्यास या फेरिवाल्यांनी मागे पुढे पाहिलेले नाही. अधिकाऱ्यांना हप्ते देतो तर येथे व्यवसाय का करणार नाही असे उत्तर खुलेआम हे फेरिवाले देत असल्याने अधिकाऱ्यांमध्येही त्यांची दहशत आहे.
गुरुवारी दुपारी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रुग्णवाहिका लावत असताना रुग्ण वाहिकेचे मागचे चाक पदपथाच्या एका कोपऱ्याला लागून तिथे लावण्यात आलेला कडाप्पा खाली पडला. नजरचुकीने ही घटना घडली होती.
तरी आरोपी फेरीवाले अशोक गुप्ता, रोहित गुप्ता यांनी चालक माळी याला ‘तू कडाप्पा का पाडलास’ असा प्रश्न करून अशोक, रोहितने गणेशला शिवीगाळ करत ठोशाबुक्क्याने बेदम मारहाण केली.
दुपारी घटना घडूनही सायंकाळ पर्यंत याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. अखेर या घटनेचे सीसीटिव्ही प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु केली.
रुग्णवाहिका चालक माळी याच्या तक्रारीवरून अशोक व रोहित या दोघा फेरिवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. फेरिवाल्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पालिकेच्या ग प्रभागाकडून या परिसरातील फेरिवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई आता किती दिवस तग धरते हे पहावे लागेल.