स्मशानदेखील कलेचे केंद्र; ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांचे प्रतिपादन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

कलाप्रदर्शन, पारितोषिक वितरण कार्यक्रमामुळे स्मशानदेखील कलेचे केंद्र बनले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक वीणा गवाणकर यांनी सफाळा येथे कार्यक्रमात बोलताना केले.

सफाळे : कलाप्रदर्शन, पारितोषिक वितरण कार्यक्रमामुळे स्मशानदेखील कलेचे केंद्र बनले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक वीणा गवाणकर यांनी सफाळा येथे कार्यक्रमात बोलताना केले. अवयवदानामुळे आपले अवयव जगतील आणि जगवतील. त्यामुळे स्मशानाला अंतिम स्थानक म्हणण्यापेक्षा देहदान, अवयवदान करून स्मशानाला जीवदानाचे जंक्‍शन बनवूया, अशा आशयाचा एक अनोखा कार्यक्रम सफाळा येथे शुक्रवार (ता. 21) ते रविवार (ता.23) दरम्यान घेण्यात आला. 

कार्यक्रमात देहदान अवयवदानविषयी जनजागृतीसाठी कला शिबिर, कला स्पर्धा निवासी कला शिबिर संपन्न झाले. बक्षीस वितरण समारंभ शनिवारी (ता. 22) सायंकाळी 5 वाजता सफाळ्याच्या स्मशानभूमीत आयोजित केला होता. या वेळी प्रमुख अतिथी "एक होता कार्व्हर'च्या लेखिका वीणा गवाणकर, आशुतोष आपटे, मनीषा चौबळ, संतोष राऊत, मधुमती कुलकर्णी तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतील कलाकार व चित्रकार उपस्थित होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी संदेशातून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. या वेळी कॅम्लिन कंपनीतर्फे 50 हजार रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली. कॅम्लिनकडून अजित राणे, शिरीष बिवलकर, संतोष काळे, जयप्रकाश ताजाने यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

ही बातमी वाचा ः फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईला मुहूर्त

 यापूर्वी प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांच्या जीवनावर आधारित शेखर नाईक दिग्दर्शित तुझी आम्री' हे दोन अंकी नाटक तसेच, "आपट्याची पानं'चे अभिवाचन हे कार्यक्रम सादर झाले. उद्‌घाटनप्रसंगी पद्मश्री सरयू दोशी, छायाचित्रकार सुधारक ओलवे उपस्थित होते. स्मशानाला या अनोख्या कार्यक्रमामुळे आकर्षक रूप प्राप्त झाले होते. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The cemetery is also the center of art; Rendering by writer Veena Gawankar