आता स्टेशनला बिनधास्त घेऊन जा आपली गाडी, पार्किंगची समस्या सुटणार

कुलदिप घायवट
Monday, 25 January 2021

मध्य रेल्वे मार्गावरील सहा रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांसाठी वाहन पार्किंगची समस्या सुटणार आहे. या स्थानकाच्याबाहेर 'पे अँड पार्क'ची सुविधा उपलब्ध झाली आहे.

मुंबई: मध्य रेल्वे मार्गावरील सहा रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांसाठी वाहन पार्किंगची समस्या सुटणार आहे. या स्थानकाच्याबाहेर 'पे अँड पार्क'ची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांबाहेर अनधिकृत पार्किंगला आळा बसणार आहे.

मध्य रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून स्थानकाबाहेरील जागेवर 'पे अ‍ॅड पार्क' सुविधा सुरु करण्यात आली आहे. यातून मध्य रेल्वेच्या महसुलात मोठी भर पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता मध्य रेल्वेने कल्याण पश्चिमेकडे, बदलापूर पूर्वकडे, विठ्ठलवाडी पश्चिमेकडे, भांडूप पश्चिमेकडे, पेण आणि पनवेल पूर्व, पश्चिम दोन्ही बाजूच्या रेल्वे स्थानकांबाहेर 'पे अ‍ॅड पार्क' सुविधा देणार असून त्यांची निविदा  काढण्यात आलेली आहे. यातून मध्य रेल्वेला 35 लाख 45 हजार 739 रुपयांचा महसूल मिळणार आहे, अशी माहिती निविदा प्रक्रियेच्या दस्तऐवजातून मिळाली. 

रेल्वे स्थानकाबाहेर अनधिकृत पार्किंगमुळे प्रवाशांना स्थानकात येण्यासाठी आणि स्थानकातून बाहेर जाण्यासाठी अडचण होत होती. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकाबाहेरील जागेवर 'पे अँड पार्क' सुविधा देण्याची योजना आखली. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रेल्वे स्थानकालगतच्या जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवीन जागांसाठी पाहणी केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेने एकूण ६० ठिकाणी पार्किंगसाठी परवानगी दिली आहे. यानुसार ४७ ठिकाणी पे अँड पार्किंगची सुविधा सुरू करण्यात आली होती. आता उर्वरित ठिकाणी पार्किग सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाकडून निविदा काढण्यात येणार आहेत. 
 
पार्किंगसाठी चार्जेस (रुपयांत)

वेळ सायकल दुचाकी चारचाकी
       
दोन तासांपर्यंत 2  5 10
सहा तासांपर्यंत 5 10 25
सहा तास ते रात्री 12 पर्यंत 10 15 50
मासिक चार्ज 125 250 625

हेल्मेटसाठी  24 तासांचे अतिरिक्त 2 रुपये द्यावे लागतील. पनवेल स्थानकासाठी दुचाकीसाठी सहा ते रात्री 12 पर्यंत 20 रुपये, तर मासिक चार्ज दुचाकीसाठी 300 रुपये आकारण्यात येणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र दाखवून दिलेल्या रकमेच्या 50 टक्के सूट देण्यात येणार आहे.

हेही वाचा- सरसकट लोकल सुरू करण्यासाठी प्रवासी संघटना आक्रमक, उद्या आंदोलन करण्याचा इशारा

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Central Railway line vehicle parking six railway stations park facility


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Railway line vehicle parking six railway stations park facility