नाताळच्या सुट्टीत रेल्वेची शिक्षा

रवींद्र खरात
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

ठाकुर्ली रेल्वेस्थानकाजवळील पुलावर गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकचा प्रवाशांना बुधवारी चांगलाच फटका बसला. सकाळी नऊ ते दुपारी दोनदरम्यान  कल्याण ते डोंबिवली रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहिल्याने रस्ते वाहतुकीवर ताण पडला. कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन अाणि एसटीच्या विशेष बस सोडण्यात आल्या तरी प्रवाशांच्या गर्दीसमोर त्या अपुऱ्याच ठरल्या. कल्याण आरटीओने आवाहन करूनही रिक्षाचालकांनी नेहमीप्रमाणे प्रवाशांची लूटमार केली. त्यातच पत्रीपूल, तिसाई, सूचक नाका अादी परिसरात वाहतूक कोंडीत भर पडल्याने प्रवाशांचे मेगाहाल झाले.

कल्याण : ठाकुर्ली रेल्वेस्थानकाजवळील पुलावर गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकचा प्रवाशांना बुधवारी चांगलाच फटका बसला. सकाळी नऊ ते दुपारी दोनदरम्यान  कल्याण ते डोंबिवली रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहिल्याने रस्ते वाहतुकीवर ताण पडला. कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन अाणि एसटीच्या विशेष बस सोडण्यात आल्या तरी प्रवाशांच्या गर्दीसमोर त्या अपुऱ्याच ठरल्या. कल्याण आरटीओने आवाहन करूनही रिक्षाचालकांनी नेहमीप्रमाणे प्रवाशांची लूटमार केली. त्यातच पत्रीपूल, तिसाई, सूचक नाका अादी परिसरात वाहतूक कोंडीत भर पडल्याने प्रवाशांचे मेगाहाल झाले.

   मध्य रेल्वेने नाताळ सणाची सरकारी सुट्टी गृहीत धरून आज ठाकुर्लीतील कामासाठी मेगाब्लॉक घेतला होता. मात्र, सुट्टीनिमित्त बाहेर पडलेले नागरिक आणि खासगी अस्थापनांमधील कर्मचाऱ्यांची त्यामुळे चांगलीच रखडपट्टी झाली. अनियंत्रित गर्दी, ढिसाळ नियोजन, बेफिकीर रिक्षाचालक आणि रस्त्यांवरील कोंडीमुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. काही प्रवाशांनी रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी रुळावरून चालत थेट डोंबिवली वा कल्याण गाठले. 

   मेगाब्लॉकनिमित्त कल्याण एसटी अागारातून केडीएमटीच्या वतीने ३५ हून अधिक बस डोंबिवलीसाठी सोडण्यात आल्या होत्या. कल्याण मात्र, एसटी अागारातून रिक्षा वा बसने पत्रीपुलापर्यंत जाण्यासाठीच तासभराचा कालावधी लागत होता.  कल्याणहून ठाणे, डोंबिवली, भिवंडी, पनवेल  अादी मार्गांवर एसटी महामंडळातर्फे विशेष बस सोडण्यात आल्या. मात्र, प्रवाशांच्या गर्दीसमोर त्याही अपुऱ्या पडल्या. वाहतूक कोंडीने नागरिकांच्या संतापात आणखीनच भर पडली. दुर्गाडी, पत्रीपूल, पलावा आदी परिसरात कोंडीने नागरिकांची रखडपट्टी झाली. गर्दीने खच्चून भरलेल्या बसमध्ये महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक अाणि विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल झाले.

 

डोंबिवलीत रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ 
मेगाब्लॉकदरम्यान दर १५ मिनिटाने लोकल सोडण्याची घोषणा रेल्वेने केली. मात्र, सकाळी साडेआठ ते साडेअकरादरम्यान डोंबिवलीत केवळ तीन लोकल आल्याने प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाट एक आणि दोनवर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. आलेल्या लोकलमध्ये प्रवाशांना चढण्याचीही संधी न मिळाल्याने प्रवाशांनी स्टेशन मास्तर कार्यालयाला घेराव घालत ज्यादा लोकल सोडण्याची मागणी लावून धरली. संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना धारेवर धरले. वाढता तणाव पाहून रेल्वे सुरक्षा बल आणि पोलिसांचा बंदोबस्त  स्थानकात वाढवण्यात आला. बस सोडण्यात येत असल्याची उद्‌घोषणा केल्याने प्रवासी बाहेर पडू लागले. रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा प्रवाशांना चांगलाच फटका बसला.

कल्याण ते डोंबिवली रिक्षाला ४०० रुपये 
कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने आवाहन करूनही रिक्षा चालकांनी ते पाळले नाही. नेहमीप्रमाणे मेगब्लॉकनिमित्त लूटमारीची परंपरा त्यांनी आजही कायम ठेवली. यात टॅक्‍सीचालकही मागे नव्हते. कल्याण ते डोंबिवली प्रतिसीट २०० ते ४०० रुपये भाडे आकारणी करून रिक्षाचालकांनी प्रवाशांचा खिसा खाली केला. यात टॅक्‍सीचालकांनीही हात धुऊन घेतले. कल्याण ते कळंबोली, ठाणे आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रतिसीट २०० ते ४०० रुपये आकारले जात होते. एवढ्या गर्दीत अन्य पर्याय नसल्याने शिवाय अपेक्षित ठिकाणी वेळेत पोहोचायचे म्हणून नागरिकांनीही खिशाला ताण देऊन प्रवास केला.

क्रिकेटपटूंची डोंबिवली ते कल्याण पायपीट
टिटवाळ्यामधून कार्तिक नाईक, आदर्श पटेल, पंकज पटेल, दिनेश कुराडे हे विद्यार्थी ठाण्याला क्रिकेटचा सराव करण्यासाठी जात होते. त्यांनी आज नेहमीप्रमाणे सकाळीच ठाणे गाठले. मात्र परत घरी येताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. डोंबिवली ते कल्याण पायपीट करत तेथून लोकलने टिटवाळा गाठावे लागले. रविवार वगळता अन्य दिवशी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकचा फटका प्रवाशांना नेहमीच बसतो. रेल्वेने आतातरी रविवारीच किंवा रात्रीच्या वेळेसच हे मेगाब्लॉक घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळावी, असे कार्तिक नाईक यांने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Railway punished Passengers on Wednesday for Christmas holidays