esakal | कोविड तपासणीपासून वाचण्यासाठी प्रवाशांची शक्कल, रेल्वेच्या चैन पुलिंगमध्ये वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड तपासणीपासून वाचण्यासाठी प्रवाशांची शक्कल, रेल्वेच्या चैन पुलिंगमध्ये वाढ 

गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि गोवा राज्यातून मुंबईत प्रवास करणाऱ्या लांब पल्यांच्या ट्रेनची मुंबईत दाखल होण्यापूर्वीच चैन पुलिंग करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

कोविड तपासणीपासून वाचण्यासाठी प्रवाशांची शक्कल, रेल्वेच्या चैन पुलिंगमध्ये वाढ 

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबईः  गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि गोवा राज्यातून मुंबईत प्रवास करणाऱ्या लांब पल्यांच्या ट्रेनची मुंबईत दाखल होण्यापूर्वीच चैन पुलिंग करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्थानकांवर पोहचल्यानंतर कोविड 19 च्या तपासणीपासून वाचण्यासाठी लांब पल्यावरील प्रवाशांकडून ही शक्कल लढवल्या जात असल्याचे उघड झाले आहे.

गेल्या 10 दिवसात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण 63 घटना घडल्या आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर दिल्ली, गुजरात राजस्थान राज्यातून सर्वाधिक ट्रेन येत असल्याने 15 ते 24 नोव्हेंबर दरम्यान 14 घटना घडल्या आहे. यामध्ये नऊ घटना बोरिवली स्थानकापूर्वी घडल्या आहे त्याप्रमाणेच चार मुंबई सेंट्रल, चार पालघर आणि दोन भोईसर स्थानका दरम्यान या घटना घडल्या आहे. तर मध्य रेल्वे मार्गावर 27 घटना घडल्या असून यामध्ये सर्वाधिक ठाणे, कुर्ला, कल्याण, एलटीटी , कसारा दरम्यान घडल्या असल्याचे दिसून येत आहे.

परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होणार 

दिल्लीत कोरोनाचा कहर पहावयास मिळत असल्याने मुंबईत कोरोनाचा पुन्हा फैलाव होऊ नये यासाठी पालिकेने कोरोना विरोधातील लढा तीव्र केला आहे. परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकासह जे मजदूर पुन्हा मुंबईत परतत आहे, अशा प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच परराज्यातून आलेली व्यक्ती कोणाकोणाच्या संपर्कात आली, अशा संशयितांचा शोध घेण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.

हेही वाचा- बॉलिवूड मेकअप आर्टिस्टसह ड्रग्ज पेडलरलाही NCB कडून अटक

दिल्लीत कोरोनाचा पुन्हा फैलाव होऊ लागल्याने मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी पालिकेने योग्य ती खबरदारी घेतली आहे. दिल्ली, गुजरात, गोवा या राज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची रेल्वे स्थानके अथवा विमानतळावर अँटीजेन टेस्ट, आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि कामगारांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याही पेक्षा म्हणजे परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती मुंबईत कोणाच्या संपर्कात आला त्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेत कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

chain pulling Cases Increase Section 141 of the Railway Act corona test

loading image