मुंबईत बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता; बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा परिणाम

समीर सुर्वे
Monday, 12 October 2020

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारी (ता.14) मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता आहे

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारी (ता.14) मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता आहे; तर रायगड जिल्ह्यात सोमवार ते बुधवार हे दिवस काहीशी अशीच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. उत्तर कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी अतिवृष्टीची शक्‍यता असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या विधानांमधून मोठी संभ्रमावस्था दिसते; प्रविण दरेकर यांचा घणाघात

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईतील तापमान 4 अंशांपर्यंत खाली आले आहे. शनिवारी मुंबईत कमाल तापमान 35 अंशांपर्यंत नोंदविण्यात आले होते. रविवारी संध्याकाळपर्यंत कुलाबा येथे कमाल 31 अंश आणि किमान 26.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सांताक्रूझ येथे कमाल 31.7 आणि कमाल 25.6 अंश तापमान नोंदविण्यात आले. मुंबईत मंगळवारपर्यंत वातावरण अंशतः ढगाळ राहणार आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये मंगळवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता आहे. बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे; तर रायगड जिल्ह्यात मंगळवारी व बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता आहे. 

फेक टीआरपी प्रकरण! मुंबईत दोघांचे, तर दमणमध्ये एकाची चौकशी

रत्नागिरी, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट 
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता आहे. बुधवारीही वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह 100 मिमीपर्यंत पाऊस होऊ शकतो. गुरुवारी या दोन्ही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्‍यता असून, 204 मिमीपर्यंत पावसाची शक्‍यता आहे. या दोन्ही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of rain with strong winds in Mumbai on Wednesday