आजपासून कोकणात मुसळधार पावसाची शक्‍यता; मुंबईतही मेघगर्जनेसह बरसणार 

समीर सुर्वे
Monday, 19 October 2020

तेलंगणामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रातून अरबी समुद्रात गेल्यानंतर आता बंगलच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई : तेलंगणामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रातून अरबी समुद्रात गेल्यानंतर आता बंगलच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवार (ता. 19) पासून मुंबई वगळता कोकणात मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता आहे. मुंबईत मात्र मंगळवारी (ता. 20) आणि बुधवारी (ता. 21) गडगडाटासह पाऊस पडेल. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. 

गुजरातमध्ये गरब्याला परवानगी नाही, मग राज्यात कशाला? सुनिल तटकरेंचा भाजपला टोला

बंगालच्या उपसागरात ऑक्‍टोबरच्या सुरुवातीला तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तेलंगणामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. ते मध्य महाराष्ट्र, कोकण असा प्रवास करत अरबी समुद्रात गेले असून सध्या ते ओमानच्या दिशेने जात आहे. या काळात झालेल्या तुफान पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले आहे. त्यानंतर आता पुन्हा उपसागरात नव्याने कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे सोमवारपासून पुन्हा कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सोमवारपासून गुरुवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता आहे. 

नवी मुंबईत बाजारभावापेक्षा दहा लाख रुपयांनी स्वस्त घरे; सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांचे प्रतिपादन

मुंबईत आज कुलाबा येथे कमाल 33 आणि किमान 26 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सांताक्रूझ येथे कमाल 33 आणि किमान 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस तापमान याच पातळीवर राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. 
-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of torrential rains in Konkan from today It will rain with thunder in Mumbai too