मुंबईतील वीज संकटामागे घातपाताची शक्यता, ऊर्जामंत्र्यांचे टि्वट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला वीजपुरवठा खंडीत झाल्याने मोठा फटका बसला होता. तब्बल साडेतीन तासांनंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. 

मुंबई- मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे सोमवारी (दि.12) संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे टि्वट करुन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे. सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास संपूर्ण मुंबईतील वीजपुरवठा खंडीत झाला होता.

सोमवारी सकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागातील वीज पुरवठा अचानक ठप्प झाला होता. त्याचा सर्वच सेवांना फटका बसला होता. मुंबई उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या विशेष लोकल ठप्प झाल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी यासाठी बैठकही घेतली होती. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला वीजपुरवठा खंडीत झाल्याने मोठा फटका बसला होता. तब्बल साडेतीन तासांनंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. 

दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या संपूर्ण प्रकारामागे घातपाताची शक्यता वर्तवली आहे. हे संकट कशामुळे ओढावले याचा आता तपास केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. 

हेही वाचा- लोकहो सावधान, कारण सिंधुदुर्गात आज तर रायगडमध्ये उद्या रेड अलर्ट

महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने  मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे. अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली होती. त्यानंतर आता त्यांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chances Of Conspiracy Behind Power Crisis In Mumbai Says power minister Nitin Raut