
माझ्याकडे 27 फोटो अन् 5 व्हिडिओ; भाजपचं दुकान बंद पाडण्याची आमच्यात ताकद; संजय राऊतांचा निशाणा
मुंबई- आम्ही एखादी गोष्ट समोर आणली म्हणून टोलधाड आमच्यावर सोडली आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. ते कुटुंबासोबत आहेत म्हणतात, पण फॅमिली का चायनिज आहे का? माझ्याकडे २७ फोटो आणि पाच व्हिडिओ आहेत. पण, आमच्यात माणूसकी आहे. म्हणून थोडी गंमत केली. सर्व बाहेर काढलं तर भाजपचं दुकान बंद पडेल, अशी टीका संजय राऊत यांनी केलीये.
आम्ही कोणाचं नाव घेतलं नाही. महाराष्ट्रातील एक नेते दिसत आहेत. त्या व्यक्तीने सांगावं की तो मी नव्हे. लोकं ओळखतात त्यांना असं मला कळलं. तेलगीने एका दिवसात १ कोटी उडवल्याचं मला माहिती होतं. पण, महाराष्ट्रातील एक माणूस मकाऊमध्ये साडेतीन कोटी उडवतो. म्हणजे अच्छे दिन आले आहेत, असा टोमणा राऊतांनी लगावला.
मी कोणाच्याही व्यक्तिगत आनंदावर विरजण घाऊ इच्छित नाही. पण, सध्या महाराष्ट्रात काय सुरु आहे. सामाजिक परिस्थिती काय आहे, दुष्काळ परिस्थिती आहे. तुम्ही जितकं खोटं बोलाल तितकं तुम्ही फसाल. फोटो आणि व्हिडिओ समोर आणून भाजपचं दुकान बंद पाडू शकतो. पण, मी तसं करणार नाही. २०२४ पर्यंत त्यांचे दुकान चालले पाहिजे, असं राऊत म्हणाले.
मकाऊमध्ये आमच्याकडे ईडी-सीबीआय
आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे आम्ही व्ययक्तिक टीका करत नाही. पण, सुरुवात कोणी केली. त्यामुळे आम्ही दाखवून दिलं की आम्हीही हात घालू शकतो. त्यांच्याकडे महाराष्ट्रात ईडी, सीबीआय असेल पण आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी-सीबीआय आहे. नाना पटोले अत्यंत योग्य बोलले. मी त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे, असं राऊत म्हणाले.
मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. अन्याय-अत्याचार सहन करुन ताऊन-सुलाखून आम्ही बाहेर आलो आहोत. शेतकरी आत्महत्या करतोय, लोक रस्त्यावर आहेत. अन् एक नेते तीन तासांत साडेतीन कोटी खर्च करत आहेत, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला.
आदित्य ठाकरेंबाबत स्पष्टीकरण
प्रख्यात फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम यास भेटण्यात काय गैर आहे. भाजपवाले मूर्ख आहेत. पंतप्रधान मोदी पितात तेच आदित्य ठाकरे प्यायले आहेत. मोदींचा जो ब्रँड आहे तोच त्यांचा ब्रँड आहे. मोदी परदेशात जाऊन जे पितात तेच ते प्यायले, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपकडून आदित्य ठाकरे यांच्या शेअर करण्यात आलेल्या फोटोवर भाष्य केलं. (Latest Marathi News)