Chandivali: चांदिवली मतदारसंघात कोणाची सरशी? महायुतीचे दिलीप लांडे, मविआचे नसीम खान यांच्यात जोरदार टक्कर
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
Mumbai News: मुंबईतील सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ अशी ओळख असलेल्या चांदीवली विधानसभेत महायुतीचे दिलीप लांडे आणि महाविकास आघाडीचे नसीम खान यांच्यात थेट लढत होणार आहे. २०१९ मध्ये दिलीप लांडे यांचा अवघ्या ४०९ मतांनी विजयी झाला होता.
गेल्या पाच वर्षांत पक्षफुटीमुळे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत कोणाची सरशी होणार, नसीम खान मागील पराभवाचे उट्टे काढणार की लांडे पुन्हा विजयी पताका फडकवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चांदीवलीमध्ये सुमारे साडेचार लाख मतदार असून मराठी आणि मुस्लिम मतदारांचे प्राबल्य आहे. विद्यमान आमदार दिलीप लांडे आणि काँग्रेसच्या नसीम खान यांच्यासह ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, येथे मुस्लिम आणि मराठी मतांची सांगड घालणाऱ्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग सोपा होतो. २०१९ मध्ये नसीम खान यांच्याबाबत असलेली नाराजी, शिवसेनेच्या ताकदीच्या जोरावर लांडे यांना निसटता विजय मिळाला होता.
मात्र यंदा सदरचे गणित जुळवताना त्यांची दमछाक होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच महायुती ंआणि महाविकास आघाडीच्या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी सामाजिक आणि प्रादेशिक गणितांची जुळवाजुळव सुरू केली असली तरी कोणाला निर्णायक आघाडी मिळणार, हे महत्त्वाचे आहे.