ज्येष्ठ नाट्यकर्मी चंद्रकांत मेहेंदळे कालवश 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

ज्येष्ठ नाट्यकर्मी चंद्रकांत मेहेंदळे यांचे (77) शनिवारी सायंकाळी 7 वाजता खासगी रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे

मुंबई : ज्येष्ठ नाट्यकर्मी चंद्रकांत मेहेंदळे यांचे (77) शनिवारी सायंकाळी 7 वाजता खासगी रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मेहेंदळे 1972 पासून रंगभूमीवर कार्यरत होते. त्याच्या निधनाने नव्या कलाकारांचा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

विजय बोंद्रे यांच्या गॉसिप ग्रुप या संस्थेत चंद्रकांत मेहेंदळे 1972 पासून काम करत होते. या संस्थेमार्फत त्यांनी अनेक नाटकांत काम केले. अभिनय, पटकथा, दिग्दर्शन अशा रंगभूमीच्या तिन्ही दालनांत त्यांनी काम केले आहे. त्यानंतर ते विनय आपटे यांच्यासोबत गणरंग संस्थेत कार्यरत होते. विनय आपटे आणि त्यांची घनिष्ठ मैत्री होती. मेहेंदळे यांनी अरुण साधू यांच्या कादंबरीवर लिहिलेले 'बहिष्कृत' नाटक प्रचंड गाजले. त्यांनी आपटे यांच्यासोबत 'चाळ नावाची वाचाळ वस्ती' या मालिकेच्या अनेक भागांचे लेखन केले. त्यांनी राज्य नाट्य आणि हौशी नाट्य स्पर्धांच्या रंगभूमीवरही काम केले.

महत्त्वाची बातमी... मुंबईतील या इमारती होणार क्वारंटाईन

मेहेंदळे यांनी 1990 पर्यंत नोकरी केली; या काळातही ते रंगभूमीवर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक रंगभूमीसाठी योगदान दिले. त्यांनी अनेक नवीन कलाकारांना या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी आयएनटीसारख्या अनेक स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही काम पाहिले. मेहेंदळे यांना वाचनाची प्रचंड आवड होती. लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ते अभिवाचनाचे कार्यक्रम घेत असत. त्यांनी विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर संस्थेच्या) सांस्कृतिक विभागाचे अध्यक्षपदही सांभाळले. या संस्थेत ते गणेशोत्सवासाठी नाटक बसवायचे.

शाळा-महाविद्यालयांचा मुहूर्त ठरला; 'या' महिन्यात शाळेची घंटा वाजणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Mehendale Passed Away