शाईफेक प्रकरणात आरोपीवरील कलम 307 मागे; पोलिसांवरील निलंबनही रद्द : Chandrakant Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil vs Manoj Gadbade

Chandrakant Patil: शाईफेक प्रकरणात आरोपीवरील कलम 307 मागे; पोलिसांवरील निलंबनही रद्द

मुंबई : पुण्यातील चिंचवडमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कथीत महापुरुषांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ शाईफेकीची घटना घडली होती. यातील आरोपी मनोज गरबडे याच्यावर कलम ३०७ अर्थात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरुन गृहमंत्रालयावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली होती.

यापार्श्वभूमीवर आता हे कलम मागे घेण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पोलिसांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याला दुजोरा दिला आहे. (Chandrakant Patil Ink throw matter Order to withdraw Article 307 on accused Manoj Garbade)

हेही वाचा: Supreme Court: "तुम्हाला फक्त पब्लिसिटी पाहिजे"; आरक्षणविरोधी याचिकेवरुन सुप्रीम कोर्टानं फटकारलं!

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर पुण्यातील ११ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसेच आरोपी मनोज गरबडे याच्यावर कलम ३०७ लावण्यात आलं होतं. याप्रकरणी आता खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पोलिसांवरील निलंबन मागे घेतलं असून आरोपीवरील कलम ३०७ मागे घेण्यात आलं आहे.

हेही वाचा: Bengaluru Lynching: 73 वर्षांच्या वृद्धाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण; लोकांच्या बेदम मारहाणीत मृत्यू

दरम्यान, यासंदर्भात राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राची दखलही फडणवीसांनी घेतली आणि पोलिसांवरील निलंबनाची कारवाई रद्द केली आहे.

राज ठाकरेंनी याबाबत एक प्रसिद्धी पत्रकही जाहीर केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, "पिंपरी चिंचवड परिसरातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि इतर काही नागरी संस्थांचे पदाधिकारी, मला भेटून गेले आणि त्यांनी पोलिसांनी दाखल केलेली कलमं ही गंभीर आहेत अशी तक्रार केली.

मुळात एखाद्याच्या जीवावर बेतेल अशा पद्धतीने निषेध नोंदवणं हे साफ बिनडोकपणाचं आहे आणि माझ्या मते हा निषेध नाही तर तो स्टंट असतो. याची जाणीव मी त्या प्रतिनिधींना करून दिली. पण असो, निषेधकर्त्यांच्यावतीने या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मला विनंती केली की, मी या प्रकरणात मध्यस्थी करावी, कारण ही कलमं कायम राहिली तर या कार्यकर्त्यांचं आयुष्य उध्वस्त होईल"

हे ही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

"मी स्वतः चंद्रकांतदादांशी बोललो, त्यांच्या कानावर ह्या सगळ्यांचं म्हणणं घातलं. त्यावर त्यांनी माझ्या विनंतीचा मान ठेवत ३०७ सारखं कलम शिथिल करण्याची तयारी दाखवली. तसंच माझं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणं झालं. पोलिसांवरच निलंबन मागे घेऊन, त्यांना पुन्हा सेवेत घ्यावं अशी विनंती मी त्यांना केली, ज्याला त्यांनी तात्काळ होकार दिला. यासाठी दोघांचे मनापासून आभार" असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.