लोखंड-पोलाद बाजार समितीत अनागोंदी; प्रहार संघटनेची एमएमआरडीएकडे तक्रार 

तेजस वाघमारे
Sunday, 18 October 2020

मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती कळंबोलीमध्ये नियमबाह्य कामे व अनियमितता आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती कळंबोलीमध्ये नियमबाह्य कामे व अनियमितता आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली आहे. याप्रकरणी एमएमआरडीएने समितीकडून खुलासा मागविला आहे. 

आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवेचा वापर करून अमेरिकन गांजाची तस्करी; टोळक्‍याचा पर्दाफाश

मुंबई महानगर लोखंड व पोलाद बाजार समिती अधिनियम 1983 नुसार स्वायत्त संस्था म्हणून कार्यान्वित आहे. बाजार समितीने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार व सरकारच्या नियमानुसार कामकाज करणे बंधनकारक असतानाही बाजार समितीमधील अधिकारी या नियमांचे व कर्तव्याचे पालन न करता अनागोंदी व भ्रष्ट कारभाराला खतपाणी घालत असल्याचे सरकारच्या लेखापरीक्षण अहवालातून उघड झाले आहे, असे प्रहार जनशक्ती पक्षाने एमएमआरडीएच्या निदर्शनास आणून दिले आहे. 

युरोपात घुमले वसईचे सुर, भावाच्या लग्नात बहिणीची अनोखी भेट

सरकारच्या स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागाच्या वार्षिक अहवाल सन 2018-19 व 2019-2020 मध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे आक्षेप नोंदविले आहेत. त्यामुळे सरकारचा महसूल बुडविला आहे हे स्पष्ट झाले आहे. यामध्ये विशेषतः बाजार समितीने व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी धोरणात्मक निर्णय घेताना केलेली अनियमितता आढळून आली आहे. मल्टी सर्व्हिसेस एजन्सीचे 31 नोव्हेंबरला 2019 ला निविदा मुदत संपल्यावरही डिफॉल्टर कंत्राटदार असताना व अटी व शर्तीचे भंग करणाऱ्या मल्टी सर्व्हिसेस एजन्सीला पुनःपुन्हा नियमबाह्य आणि बेकायदा ई-निविदा प्रक्रिया न राबवता टोल चालवण्यास मुदतवाढ दिल्याचा आरोपही संघटनेने पत्रात केला आहे. यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षचे अध्यक्ष संतोष गवस यांनी एमएमआरडीए आयुक्त, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदन व तक्रार केली आहे. 

समितीमध्ये अनियमितता झाली असल्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. याप्रकरणी समितीला खुलासा करण्यास सांगितले आहे. 
- बी. जी. पवार,
सहआयुक्त, एमएमआरडीए 

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chaos in the ironsteel market committee Complaint of Prahar organization to MMRDA