नागरिकांची चळवळ ही कोणी रोखू शकत नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

रविंद्र खरात 
रविवार, 1 जुलै 2018

महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सव राज्यस्तरीय शुभारंभ आज रविवार ता 1 जुलै रोजी कल्याण जवळील वरप गावातील संरक्षित वन सर्व्हे क्र. 25 राधा स्वामी सत्संग जवळ, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. 

कल्याण - वृक्षारोपन हा केवळ एक कार्यक्रम नाही सृष्टी, विश्व वाचवण्याचा उपक्रम आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम राहिला नसून आता ही चळवळ झाली असून आजचा दिवस भारताच्या इतिहास मधील नवीन विक्रम करणारा दिवस असून ही नागरिकांची चळवळ कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण जवळील वरप गावात झालेल्या एका कार्यक्रमात केले. 

महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सव राज्यस्तरीय शुभारंभ आज रविवार ता 1 जुलै रोजी कल्याण जवळील वरप गावातील संरक्षित वन सर्व्हे क्र. 25 राधा स्वामी सत्संग जवळ, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार मंगलप्रभात लोढा, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, संजय केळकर, किसन कथोरे, सुभाष भोईर, ज्योती कलानी सिने निर्माता सुभाष घई आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आपल्या भाषणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचा दिवस भारताच्या इतिहासातील नवीन विक्रम करणारा दिवस असल्याचे सांगितले आणि पुढे ते म्हणाले की, पर्यावरण संरक्षणकरता राज्यात 50 कोटी वृक्ष लावायची संकल्पना सुधीर मुनगुंटीवार यांनी मंत्रिमंडळात मांडला आणि त्याला सुरवात झाली. सन 2016 मध्ये 3 कोटी वृक्ष लागले. मागील वर्षी 5 कोटीपेक्षा अधिक वृक्ष लागले. यावर्षी 13 कोटी वृक्षलागवडीसाठी महाराष्ट्र मैदानात उतरला असून राज्याने एक नवीन रेकॉर्ड निर्माण केला आहे. वृक्षारोपन हा केवळ एक कार्यक्रम राहिला नसून सृष्टी, विश्व वाचवण्याचा उपक्रम आहे. हा उपक्रम कागदावर नसून एक चळवळ उभी राहिली असून ती रोखू शकत नसल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

आज ज्याप्रकारे जल, जंगल, जमीन या तीन गोष्टींचा ऱ्हास झाल्याने भीषण संकट आपल्या सहित जगासमोर ठाकले असून भावी पिढीला दुःखाच्या खाईत लोटतोय. आपल्या पूर्वजांनी दिलेली देणगी आपण जपू शकलो नाही, अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी पर्यावरणपूरक अत्यावश्यक पॅरिस समझोता घडवून आणला. वाढत्या तापमानामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतोय. संपूर्ण विश्वाला धोका निर्माण झालाय. आताच काही तरी करण्याची वेळ आहे. याच पिढीला या संकटातून बाहेर पडावे लागेल. त्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही काम सुरू केले असून 33 टक्के वन आच्छादनकरीता 400 कोटी वृक्ष लावायची आहेत. हा कार्यक्रम सरकारचा, कागदावरचा नाही. संपूर्ण लोकांचा हा कार्यक्रम झालाय. जनतेचे जेव्हा आंदोलन सुरू होते तेव्हा त्याला कोणीही थांबवू शकत नाही. प्रत्येक झाडाचे जिओ टॅगिंग होतंय. प्रत्येक वृक्षाचा हिशोब वन विभागाने ठेवला आहे. हरित महाराष्ट्राचे आपण जे स्वप्न बघितलं आहे ते पूर्ण होणारच असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Devendra Fadnavis inaugurated the state level Forest Festival of Maharashtra