esakal | कांजूरमार्गच्या जमिनीबाबत मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत; भाजप आमदाराची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

कांजूरमार्गच्या जमिनीबाबत मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत; भाजप आमदाराची टीका

कांजूरमार्ग मध्ये मेट्रो ची कारशेड उभारण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा जनतेची दिशाभूल करणारी आहे, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

कांजूरमार्गच्या जमिनीबाबत मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत; भाजप आमदाराची टीका

sakal_logo
By
कृष्ण जोशी


मुंबई ः कांजूरमार्ग मध्ये मेट्रो ची कारशेड उभारण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा जनतेची दिशाभूल करणारी आहे, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. मेट्रो कारशेडला त्यांनीच गेले नऊ महिने स्थगिती दिल्याने रोजच्या होणाऱ्या पाच कोटी रुपयांच्या नुकसानीला जबाबदार कोण, याचा जाब मुख्यमंत्र्यांनी आधी द्यावा, असेही त्यांनी बजावले आहे. 

डोंबिवलीकरांनी पालिकेचे घोडं मारलं का?, मनसे करणार आंदोलन

आजच दूरदर्शनवर जनतेला संबोधित करताना ठाकरे यांनी वरील घोषणा केली आहे. हे कारशेड आरे ऐवजी कांजूरमार्ग च्या शासकीय जमिनीवर होणार असल्याने सरकारला त्यासाठी जमिनीचा खर्च येणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. त्यावर टीका करणारा व्हिडियो भातखळकर यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित  केला असून त्यात ही टीका केली आहे. ही जमीन न्यायालयीन खटल्यांमध्ये अडकली आहे. तसेच मेट्रो कारशेड आरे मध्येच करावे, असा अहवाल ठाकरे सरकारनेच नेमलेल्या तज्ञ समितीनेही दिला होता, याचीही आठवण भातखळकर यांनी करून दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांची घोषणा ही मुंबईकर व महाराष्ट्राच्या जनतेची संपूर्णपणे दिशाभूल करणारी आहे. मेट्रो ची कारशेड आरे मध्ये उभारण्यास त्यांनीच स्थगिती दिल्यावर त्यांच्याच सरकारने यासंदर्भात शिफारस करण्यासाठी तज्ञ समिती नेमली होती. मेट्रो कारशेड आरे मध्येच व्हावी अशी शिफारस या समितीनेही सरकारला केली होती. काही दिवसांपूर्वी मेट्रो कारशेडसाठी गोरेगाव पहाडी च्या जागेची पहाणी करू, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा, आरेचं कारशेड कांजूरमार्गला

कांजूरमार्गची जागा न्यायालयीन खटल्यांमध्ये अडकली आहे. तसेच  ती जागा मेट्रो कारशेडसाठी योग्य नाही, असा अहवाल जुन्या सरकारकडेही आला होता. ठाकरे सरकारने नेमलेल्या समितीनेही तसाच अहवाल दिला होता. तरीही अशा प्रकारची दिशाभूल करणारी विधाने करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आपण निषेध करतो, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. मेट्रो कारशेडला मुख्यमंत्र्यांनी गेले नऊ महिने स्थगिती दिल्यामुळे रोजचे पाच कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यास कोण जबाबदार आहे, याचा जाब प्रथम मुख्यमंत्र्यांनी द्यावा, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )