esakal | नायर रुग्णालयास १०० कोटींचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नायर रुग्णालयास १०० कोटींचा निधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नायर रुग्णालयातील (Nair Hospital) रुग्णांसाठी विविध सुविधा आणि आधुनिकतेवर भर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संस्थेला राज्य सरकारच्या (state government) वतीने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.

गरजू रुग्णांच्या सेवेत ही संस्था शतायुषी होते आहे, हे समाधान काही वेगळे असून या संस्थेचा हा प्रवास थक्क करणारा आहे. आज मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद आहेत. देव केवळ मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये नाही. तर डॉक्टरांच्या रूपात रुग्णांचा जीव वाचवत आहे. कोविडचे संकट हे अनपेक्षित तितकेच अनाकलनीय होते. त्यावर उपाययोजनांमुळे राज्य सरकार, प्रशासनाचे सर्वत्र कौतुक झाले; मात्र या कौतुकाचे खरे मानकरी सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोविडच्या अगोदर १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली होती, आता त्याची काही माहिती उपलब्ध असेल असे वाटत नाही; मात्र यापुढे कोणताही विषाणू येईल त्या वेळी कोरोना काळात आपण काय केले? काय करायला हवे? याची अधिकृत नोंद करण्याची आवश्यकता असून ही माहिती ५०-१०० वर्षांनंतरदेखील उपलब्ध होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज बोलून दाखवतानाच या संस्थेला जेव्हा २०० वर्षे पूर्ण होतील त्या वेळी इतिहासात या रुग्णालयाच्या कार्याची नोंद होईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. नायर रुग्णालयाला १०० कोटींचा निधी देण्याची घोषणा करतानाच १०० वर्षांनंतरही लोकांसाठी हितकारक ठरेल असे काम करून दाखवण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी या वेळी केले. पालकमंत्री अस्लम शेख आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनीही कोरोना काळात नायर रुग्णालयाने केलेल्या सेवेचा गौरव केला.

हेही वाचा: गणेशोत्सवातच यंदा कोविड लसीकरणोत्सव

नियम पाळून उत्सव साजरा करा !

मुंबई : कोविड आटोक्यात आला असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अनेक निर्बंध शिथिल केल्यामुळे गर्दी वाढल्याने धोका टाळण्यासाठी नियमांचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. गणेशोत्सव माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिका तयार केली आहे.

यात गणेशोत्सवातील नियमावलीबरोबरच नैसर्गिक विसर्जन स्थळे, कृत्रिम विसर्जन स्थळे यांची माहिती नमूद आहे. विसर्जन स्थळांपर्यंत पोहचण्याचे नकाशेही आहेत. समुद्राच्या भरती-ओहोटीचे वेळापत्रकही यात आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर ही माहिती पुस्तिकाही उपलब्ध आहे. महापालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in किंवा http://portal. mcgm.gov.in यावरही उपलब्ध आहे.

loading image
go to top