मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार?, संजय राऊतांनी केलं स्पष्ट

पूजा विचारे
Tuesday, 21 July 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या भूमिपुजनासाठी अयोध्येला जाणार की नाही हे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईः राम मंदिर भूमीपुजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. 'राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंदिराचं भूमी पूजन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या भूमिपुजनासाठी ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आलं. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचाही समावेश आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या भूमिपुजनासाठी अयोध्येला जाणार की नाही हे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील. 

अधिक वाचाः  लॉकडाऊनमध्ये पश्चिम रेल्वेला नफा तर झाला पण भरावा लागला 'इतक्या' कोटींचा भुर्दंड

उद्धव ठाकरे अयोध्येला  नक्की जातील. शिवसेनेचं या विषयाशी एक भावनिक, धार्मिक आणि राजकीय नातं जोडलेलं आहे. आज जे भव्य राम मंदिर आणि सोहळा होत आहे त्यातील अडथळे दूर करण्यासाठी शिवसेनेनं मोठं योगदान दिलं आहे. मी काल सांगितलं त्याप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजेच सरकारचे १०० दिवस झाल्यावरही गेले होते, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. 

तसंच देशाच्या, हिंदुत्त्वाच्या दृष्टीने भूमिपूजनाचा हा सोहळा ऐतिहासिक आहे. कोरोनाचं संकट नसतं तर लाखो रामभक्त तिथे आले असते. पण कोरोनामुळे निमंत्रण देण्यावर बंधनं असून मला मिळालेल्या माहितीप्रमाणे १५० लोकांना बोलावण्यात येणार असल्याचं ते यावेळी म्हणालेत. 

हेही वाचाः काँग्रेसनं 'त्या' वादापासून दूर राहावं, काँग्रेस नेत्यांचा पक्षाला घरचा आहेर

राम मंदिर मंदिर उभारणीबाबत आग्रही भूमिका घेणारे मुख्यमंत्री या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार का? याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यावर संजय राऊतांनी माहिती दिली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी ५ कोटींची देणगीही शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेली आहे.

याआधी आमंत्रण न मिळाल्याबद्दल संजय राऊत म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे. अयोध्येच्या रस्त्यातील सर्व अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत.

Chief Minister Uddhav Thackeray Will go Ayodhya Sanjay Raut clarified


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray Will go Ayodhya Sanjay Raut clarified