काँग्रेसनं 'त्या' वादापासून दूर राहावं, काँग्रेस नेत्यांचा पक्षाला घरचा आहेर

पूजा विचारे
Tuesday, 21 July 2020

माजी खासदार संजय निरुपम यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या वादापासून काँग्रेसला दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. संजय निरुपम यांनी ट्विट करून राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

मुंबईः  राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरुन भाजप आणि शिवसेनेमधलं राजकारण तापलं आहे. त्यातच माजी खासदार संजय निरुपम यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या वादापासून काँग्रेसला दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. संजय निरुपम यांनी ट्विट करून राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. तसंच निरुपम यांनी काँग्रेस राम मंदिराच्या विरोधात नाही आहे, असं म्हणत काँग्रेसचं लक्ष वेधलं आहे. 

राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलीत. काही लोकांना असं वाटतंय की, राम मंदिर बांधून देशातून कोरोना दूर होईल, अशा शब्दात शरद पवारांनी सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता निशाणा साधला होता.  

संजय निरुपम म्हणाले की, राम मंदिराच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विनाकारण प्रश्नचिन्हे निर्माण केली आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजन सोहळ्याला जाण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे काँग्रेसने या वादापासून दूर राहिलेलं बरं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच राम मंदिराचं निर्माण होत आहे. काँग्रेस मंदिर बनविण्याच्या विरोधात नाही. 

हेही वाचाः  डॅशिंग नेते नितीन नांदगावकर यांना शिवीगाळ करत धमकीचा फोन

भाजपकडून शरद पवारांना टोला

राम मंदिराच्या भूमिपुजनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  भाजपला टोला लगावला होता. आता शरद पवारांच्या वक्तव्यानंतर भाजपचे विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे  शरद पवार यांच्या NOC गरज लागणार नाही, असा खोचक टोला दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. 

अधिक वाचाः  संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत, 'या' दिवशी होणार प्रसारित

शरद पवार यांनी मुस्लिमांना खूश करण्यासाठी राम मंदिराबद्दल वक्तव्य केलं का? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे.  राम मंदिराच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पण, अजून उद्धव ठाकरे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. 'अयोध्येत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांच्या एनओसीची गरज लागणार नाही, ही अपेक्षा आहे, असं म्हणत  दरेकरांनी पवारांना टोला लगावला आहे.

ayodhya ram temple bhoomi pujan ceremony issue congress leader sanjay nirupam react on twitter


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayodhya ram temple bhoomi pujan ceremony issue congress leader sanjay nirupam react on twitter