मृत्यूच्या तांडवात नव्या जिवाचा जन्म 

मंगेश सौंदाळकर 
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मुंबई - अंधेरीतील कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात मृत्यूचे अग्नितांडव सुरू असतानाच एक नवा जीव या जगात आला. रुग्णालयात दाखल झालेल्या गर्भवतीने अग्निशमन दलाच्या शिडीवरून बाहेर येऊन एका बाळाला जन्म दिला. दोघांनाही अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मुंबई - अंधेरीतील कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात मृत्यूचे अग्नितांडव सुरू असतानाच एक नवा जीव या जगात आला. रुग्णालयात दाखल झालेल्या गर्भवतीने अग्निशमन दलाच्या शिडीवरून बाहेर येऊन एका बाळाला जन्म दिला. दोघांनाही अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

प्रसूती कळा सुरू झाल्यामुळे ही गर्भवती सोमवारी रुग्णालयात आली होती. आगीमुळे धावपळ सुरू झाल्यावर तिने बचावासाठी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला शिडीवरून सुखरूप बाहेर काढले. रुग्णालयातून बाहेर येताच तिने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर आई आणि बाळाला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलातील जवान शिडीवरून महिलांना खाली उतरवत होते. त्या वेळी एका गर्भवती महिलेने दुसऱ्या महिलेला आधी जायला सांगितले. 

रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी दाखल झालेले संतोष परब यांना एमआरआयसाठी नेण्यात आले होते. त्याच वेळी आग लागली. त्या गोंधळात ते कसेबसे धावत खाली आले. तिसऱ्या मजल्यावर उपचार घेणारे गिरीश पटेलही धुरातून रस्ता काढत बाहेर आले. 

स्थानिक तरुणांची मदत 
रुग्णालयात आग लागल्याचे समजताच स्थानिक तरुण मदतीसाठी धावले. गौतम नगरमधील महिलांच्या साड्या आणि ओढण्यांची रस्सी करून त्यांनी 25 रुग्णांची सुटका केली, असे विशाल लष्करे यांनी सांगितले. 

तिघांची सुटका 
अग्निशमन दलाने रात्री "कुलिंग ऑपरेशन' सुरू केले. त्या वेळी तिसऱ्या मजल्यावर एक बाळ, एक वृद्ध आणि एक पुरुष असे तिघे जण बेशुद्धावस्थेत सापडले. जवानांनी त्या तिघांनाही सुखरूप खाली आणले. 

रुग्णालयाची रचना 
- तळमजला : अपघात विभाग 
- पहिला मजला : बाह्य रुग्ण विभाग 
- दुसरा मजला : स्त्रीरोग व प्रसूती विभाग 
- तिसरा मजला : शस्त्रक्रिया कक्ष 
- चौथा मजला : अतिदक्षता व शस्त्रक्रिया विभाग 

Web Title: Child birth in Andheri ESI hospital