शालेय फी भरली नाही म्हणून मुलाला कोंडले खोलीत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

green english school dombivali
शालेय फी भरली नाही म्हणून मुलाला कोंडले खोलीत?

शालेय फी भरली नाही म्हणून मुलाला कोंडले खोलीत?

डोंबिवली : दोन वर्षाचे शालेय शुल्क भरले नसल्याने मुलाला शाळेतून त्रास देण्यात येत होता. बाकावर उभे करुन ठेवणे, ज्या मुलांनी फी भरली नाही त्यांना वेगळे बसविणे असे प्रकार सुरु होते. त्यातच मंगळवारी तर चक्क चंदन गिरी या मुलाला शाळेने एका खोलीत दोन तास कोंडून ठेवल्याचा आरोप खुद्द विद्यार्थ्याने व त्याच्या वडिलांनी केला आहे. खोलीत कोंडल्यामुळे मुलाला चक्कर आली, त्यानंतर त्याला उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. ग्रीन इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापनाने मात्र मुलाला कोंडून ठेवल्याचा आरोप फेटाळला आहे.

डोंबिवली पूर्वेतील आजदेगाव परिसरात मनोज गिरी रहात असून त्यांची दोन मुले मिलाप नगर परिसरातील ग्रीन इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. कोरोना काळात मनोज हे शाळेची फी भरु शकलेले नाही. शाळा आता सुरु झाल्या असल्याने शालेय शुल्क रखडलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी शाळेकडून तगादा लावण्यात येत असल्याचा आरोप मनोज यांनी केला आहे. मनोज म्हणाले, माझी दोन्ही मुले ग्रीन इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे. एकाने नुकतीच दहावीची परीक्षा दिली असून दुसरा आता दहावीत गेला आहे. सहा महिने झाले शाळा सुरु झाली आहे. सहा महिन्यात मी 37 हजार फी भरली आहे. आठवड्या भरापासून माझा मुलगा चंदन याला त्रास दिला जात आहे. 13 तारखेला त्याला वर्गात उभे ठेवले होते. तसेच फी भरली नाही तर शाळेत येऊ नको असे सांगितले होते.

सोमवारी काही मुलांना ज्यांची फी बाकी आहे त्यांना शाळेने वेगळ्या खोलीत बसविले होते. मंगळवारी चंदन शाळेत जात नव्हता परंतु मी त्याला जाण्यास सांगितले. दुपारी शाळेतून फोन आला की तुमचा मुलगा चक्कर येऊन पडला आहे शाळेत या असे सांगितल्यानंतर मी शाळेत गेलो व त्यानंतर त्याला उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात आणले आहे. तर विद्यार्थी चंदन म्हणाला, मुख्याध्यापिका माधुरी प्रधान यांनी जोपर्यंत फी भरत नाही तोपर्यंत शाळेत येऊ नका असे सांगितले, त्यामुळे शाळेत जायचे कसे असा प्रश्न पडला होता. मला एका वेगळ्या खोलीत दोन ते अडीच तास बसविण्यात आले होते. तेव्हा मला वडील शाळेची फी कशी भरणार याचे टेन्शन आले होते, त्यात मला चक्कर आली.

ग्रीन इंग्लिश स्कूल व्यवस्थापनाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. डोंबिवली प्रोग्रेसिव्ह ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अरुण पाटील व शालेय व्यवस्थापनाचे अध्यक्ष मोहन गोखले यांनी पत्रकारांशी संवाद साधत मुलाला शाळेत कोंडून ठेवल्याचा आरोप फेटाळला. मुलाची दोन वर्षाची शालेय फी शिल्लक असून शाळेकडून विद्यार्थ्यांना पालकांना त्याची आठवण करुन देण्याविषयी सातत्याने सांगण्यात येत होते. चंदन याची दोन वर्षाची साधारण 26 हजार रुपये फी बाकी आहे. मंगळवारी त्याला याविषयी विचारणा करण्यात आली होती व बाजूच्या खोलीत बसविण्यात आले होते. शाळा सुटल्यानंतर तो जिन्यावरून उतरत असताना त्याला चक्कर आली. त्याला एका रुममध्ये बसवून त्याच्या पालकांना पाचारण करण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

Web Title: Child Locked Room Because School Fees Not Paid Allegation Parents Harassing Child School Administration Denied Allegation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top