विक्रोळीतील तरुणांकडून चक्क ऑनलाईन आंदोलन; वाचा काय आहे प्रकरण...

मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

क्रांती ज्योती महात्मा फुले रुग्णालय पुनर्बांधणीसाठी तीन वर्षांपासून बंद आहे रुग्णालयाचे बांधकाम रखडल्याने उपनगरातील कोविड 19  रुग्णांची गैरसोय होत आहे.

मुंबई : विक्रोळी कन्नमवारनगर येथील महानगरपालिकेचे क्रांती ज्योती महात्मा फुले रुग्णालय पुनर्बांधणीसाठी तीन वर्षांपासून बंद आहे रुग्णालयाचे बांधकाम रखडल्याने उपनगरातील कोविड 19  रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णालयाची पुनरबांधणी व्हावी यासाठी काही तरुण एकवटले असून त्यांनी ऑनलाईन आंदोलन सुरू केले आहे.

वाचा -  'आदित्यबाळा तू अजून कोषात आहेस'; भाजप आमदारांकडून पर्यावरण मंत्र्यांची खिल्ली...

मुंबई उपनगरांतील महत्वाच्या रुग्णालयांपैकी हे एक महत्वाचे रुग्णालय आहे.मात्र इमारतीची दुरवस्था झाल्याने त्याची डागडुजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या रुग्णालयाच्या जागेवर सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. गेली अनेक वर्षांपासून विक्रोळी,कांजूरमार्ग, पवई, भांडुप येथील नागरिकांना याबाबत फक्त आश्वासन देण्यात येत होते. सन 2018 रोजी महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या जागेवर 10 मजली 310 खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णायल उभारण्यात येईल, असे सांगून ही इमारत खाली करण्यात आली आणि काही भाग टागोर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय येथे स्थलांतरित करण्यात आले. मात्र, तीन वर्षे होऊनही महात्मा फुले रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्यात आलेले नाही. 

वाचा - ऐश्वर्या आणि आराध्याला कोरोना झाल्याचं कळाल्यावर विवेक ऑबेरॉयने केलं ट्विट.. - 

गेल्या 3 वर्षांपासून हे रुग्णालय बंद अवस्थेत आहे. बंद असल्याने रुग्णालयाच्या इमारतीची अधिकच दुरवस्था झाली आहे. जुने रुग्णालय बंद तर नवीन सुरू होत नाही त्यामुळे आसपासच्या रुग्णांची फरफट सुरू आहे. पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता,'  या  नवीन रुग्णालयामध्ये स्वतंत्र प्रसूती विभाग, क्ष किरण विभाग, सोनोग्राफी विभाग, एमआरआय, सीटी स्कॅन, आयसीयू यासह अनेक अत्याधुनिक सोयीसुविधांनी हे रुग्णालय सज्ज असेल असे वारंवार सांगून वेळ लागत असल्याचे सांगण्यात येते. पालिका प्रशासनाकडून चालढकल सुरू असल्याचे लक्षात येताच शेवटी पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी विक्रोळीतील तरुणाईने पुढाकार घेतला आहे. रुग्णालयाचे बांधकाम लवकर सुरू व्हावे यासाठी त्यांनी ऑनलाइन आंदोलन सुरू केले आहे.

वाचा - सणासुदीच्या दिवसांत रायगड जिल्ह्याचा धोका वाढणार; मोठी माहिती आली समोर...

विक्रोळी कन्नमवार नगर येथिल महात्मा ज्योतिबा फुले सर्व साधारण हाॅस्पिटल हे गेल्या 3 वर्षापासून टेकू लाऊन धुळखात इमारत पडलेल्या अवस्थेत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना या हाॅस्पिटलकडे लक्ष देण्यास वेळ नाही. आज जर हे  हाॅस्पिटल सुरू असते तर कोरोना संकटात मोठ्या प्रमाणात मदत झाली असती. जर रुग्णालय बनवायचे नव्हते तर  खालीच का केले. भविष्यात नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी या हेतूने 'आम्ही विक्रोळीकर" या नात्याने हे हाॅस्पिटल लवकरात लवकर तयार व्हावे म्हणून Online आंदोलन सुरू केले आहे. ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून आम्ही आमचे म्हणणे लोकांपर्यत आणि सरकारपर्यत पोहचवले आहे असे आंदोलन करणाऱ्या तरुणांनी सांगितले.

 

पालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने भाजपच्या दबावामुळे म्हाडाने 'ना हरकत दाखला' देण्यास टाळाटाळ केली. आता मात्र ना हरकत दाखल्याचा मार्ग मोकळा झाला असून इमारतीचा आराखडा ही अंतिम टप्प्यात आहे. इमारतीचे बनधकाम लवकर सुरू करू.

अमेय घोले , अध्यक्ष , आरोग्य समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chucky online movement from the youth of Vikhroli; Read what's the case ...