नववर्षात सिडकोची 65 हजार घरे! व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची घोषणा

सुजित गायकवाड
Saturday, 21 November 2020

सिडकोतर्फे नव्या वर्षात तब्बल 65 हजार घरांची सोडत निघणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील "सर्वांसाठी घरे' या उद्दिष्टपूर्तीसाठी सिडकोकडून सुमारे एक लाख घरांचे बांधकाम नवी मुंबईतील विविध उपनगरांमध्ये सुरू आहे.

नवी मुंबई : सिडकोतर्फे नव्या वर्षात तब्बल 65 हजार घरांची सोडत निघणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील "सर्वांसाठी घरे' या उद्दिष्टपूर्तीसाठी सिडकोकडून सुमारे एक लाख घरांचे बांधकाम नवी मुंबईतील विविध उपनगरांमध्ये सुरू आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 65 हजार घरांची एकत्रितरीत्या सोडत काढली जाणार आहे. सिडकोच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्‍या मोठ्या प्रमाणात घरांची सोडत काढली जाणार आहे. सध्या सिडकोतर्फे खारघर, तळोजा, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या ठिकाणी 14 हजार 838 घरे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामांची पाहणी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी केली. यावेळी त्यांनी सिडकोतर्फे नववर्षात 65 हजार घरांची सोडत जाहीर करू, असे स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा - टीआरपी गेरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) गुन्हा दाखल

भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोमार्फत एमएमआर क्षेत्रात तब्बल दोन लाख घरे बांधण्याचा संकल्प केला होता. त्याअनुषंगाने सिडकोतर्फे नवी मुंबई परिसरात 90 हजार घरे उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीसाठी सिडकोने नवी मुंबईतील बस आगार, ट्रक टर्मिनल्स, रेल्वे स्थानकांमधील कॅफेटेरीया आणि वाहन तळांच्या जागा आरक्षित केल्या आहेत. या जागांवर घरे उभारण्याची रचनाही सिडकोने मंजूर करून घेतली आहे. प्रवासाच्या ठिकाणीच राहण्याची जागा मिळाल्याने वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. त्याकरीता सिडकोतर्फे वाहनतळांच्या जागांवर टॉवर उभे केले जात आहेत. सिडकोच्या एवढ्या घरांमुळे बांधकाम क्षेत्रात मुबलक प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहेत. त्याचा परिणाम घरांच्या किमतींवर होऊन सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

कोणत्या भागात असतील ही घरे 
सिडकोतर्फे वाशी ट्रक टर्मिनल्सस, खारघर रेल्वेस्थानक, खारघर बसस्थानक, कळंबोली बस आगार, पनवेल आंतरराज्यीय बस स्थानक, नवीन पनवेल बस आगार, खांदेश्‍वर, मानसरोवर, खारकोपर, तळोजा, जुईनगर, नेरूळ, सानपाडा, सीबीडी-बेलापूर, बामणडोंगरी आदी 27 ठिकाणी मोक्‍याच्या जागेवर ही 90 हजार घरे उभारली जात आहेत. 

हेही वाचा तीन बांगलादेशी नागरिकांना घाटकोपरमधून अटक; एटीएसची कारवाई

महागृहनिर्माणच्या घरांचा ताबा मार्च 2021 पर्यंत 
सिडकोतर्फे राबवण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण प्रकल्पातील यशस्वी ग्राहकांना घरांचा प्रत्यक्ष ताबा मार्च 2021 पर्यंत मिळणार आहे, असेही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले. मुखर्जी यांनी आज बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतींच्या ठिकाणी भेटी दिल्या. या ठिकाणी सुरू असलेल्या अंतिम बांधकामांचा आढावा घेत लवकरात लवकर बांधकामे पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

CIDCOs 65 thousand houses in New Year Managing Director Dr. Announcement by Sanjay Mukherjee

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CIDCOs 65 thousand houses in New Year Managing Director Dr. Announcement by Sanjay Mukherjee