सिडकोच्या मेट्रोचे काम "महामेट्रो' पूर्ण करणार; नागपूर आणि पुणेपाठोपाठ नवी मुंबई मेट्रोलाही चालना 

सुजित गायकवाड
Wednesday, 6 January 2021

सिडको महामंडळातर्फे खर्च ठेव प्रणालीनुसार नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाने दिलेल्या संमतीनंतर साधारणतः एक वर्षाच्या कालावधीत महा मेट्रो काम पूर्ण करणार आहे. 

नवी मुंबई  : सिडकोकडून नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील सीबीडी-बेलापूर ते पेईंधरमार्ग या 11.1 किलो मीटरच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी सिडकोने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) यांची नियुक्ती केली आहे. सिडको महामंडळातर्फे खर्च ठेव प्रणालीनुसार नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाने दिलेल्या संमतीनंतर साधारणतः एक वर्षाच्या कालावधीत महा मेट्रो काम पूर्ण करणार आहे. 

मुंबई, नवी मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सिडको नवी मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्प साकारत आहे. सप्टेंबर 2019 मध्ये बेलापूर ते पेईंधर या मार्गावर मेट्रोची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली होती. या चाचणीनंतर लवकरच मेट्रो धावेल अशी अपेक्षा नागरीकांना होती. मात्र मनुष्यबळाची कमतरता आणि नियोजन नसल्यामुळे पुन्हा सिडकोचे काम रखडले होते. मात्र सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर डॉ. संजय मुखर्जी यांनी मेट्रो प्रकल्पासाठी सिडकोतर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांचा आणि त्यातील व्यामिश्रतेचा सखोल अभ्यास केला. त्यानुसार विद्युत पुरवठा, माहिती तंत्रज्ञान, स्थापत्य आणि यांत्रिक अभियांत्रिकी, दूरसंचार आणि संदेशवहन या विविध बाबींमध्ये भरीव काम करण्याचे निश्‍चित झाले. सद्यस्थितीत बेलापूर ते पेईंधर मार्गावर उभारण्यात येणाऱ्या 11 स्थानकांपैकी 1 ते 6 स्थानकांच्या उभारणीचे काम काही तांत्रिक कारणांमुळे रखडले आहे. तसेच कोविड-19 मुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे अपेक्षित गतीने होत नव्हते. यामुळे सदर मार्गावरील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे, या निकषांचा विचार करून या मार्गाचे काम महा मेट्रो यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

रावणाने सीतेचे हरण केले तीच ही सीतागुंफा! नाशिकच्या पंचवटीत त्या खुणा आजही..

नागपूर आणि पुणे मेट्रो उभारणीचा अनुभव कामास येणार 
महामेट्रो या कंपनीला नुकत्याच यशस्वीरीत्या कार्यान्वित झालेल्या नागपूर मेट्रो टप्पा 1 आणि पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या मार्ग क्र. 1 आणि 2 च्या बांधणी, अंमलबजावणी आणि परिचालन आणि निगराणीचा अनुभव आहे. यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या बेलापूर ते पेईंधर या मार्गावरील उर्वरित कामांची जलदरीत्या अंमलबजावणी करताना महा मेट्रोच्या अनुभवाचा फायदा होणार आहे. 

 

प्रकल्पासाठी अर्थपुरवठा, आर्थिक शिस्त, मेट्रो मार्गालगच्या जमिनीचे मुद्रीकरण, प्रवासी भाड्याव्यतिरिक्त अन्य महसूल वाढवणे आणि उत्तम परिवहन जोडणी देणे या बाबींवरही आपण लक्ष केंद्रीत करणार आहोत. परिवहन केंद्रीत विकासाकरिता आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. 
डॉ. संजय मुखर्जी 
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको 

CIDCOs Metro to be completed by Mahametro Navi Mumbai Metro to be launched after Nagpur and Pune

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CIDCOs Metro to be completed by Mahametro Navi Mumbai Metro to be launched after Nagpur and Pune