Vidhan Sabha 2019 : पंतप्रधानसाहेब, 'आमच्याकडे मतं मागायला येऊ नका'

सुचिता करमरकर
Sunday, 13 October 2019

शहरातील नागरी समस्यांनी बेजार झालेल्या विजय गोखले या ज्येष्ठ नागरिकाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहिले आहे.

कल्याण-डोंबिवली : शहरातील नागरी समस्यांनी बेजार झालेल्या विजय गोखले या ज्येष्ठ नागरिकाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहिले आहे. वर्षानुवर्ष या शहरात राहणाऱ्या नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्यांवर राज्यातील तसेच पालिकेतील भारतीय जनता पक्षासह कोणत्याही पक्षाला उपाययोजना करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे वर्षाचे सर्व दिवस येथील नागरिक नरक यातना भोगत आहेत, अशी भावना गोखले यांनी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपण या शहरात आपल्या पक्षासाठी मते मागायला येऊ नका, अशी विनंती हताश होत गोखले यांनी केली आहे. पत्राच्या सुरवातीलाच गोखले यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत त्यांच्यावर आपला विश्वासही व्यक्त केला आहे. 

स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी तसेच सरकारी अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराकडेही गोखले यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीतील रस्ते, पाणी, आरोग्यसेवा, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक परिवहन सेवा, उद्याने यांची स्थिती अत्यंत खराब आहे.

रिक्षाचालकांची मनमानी, वाहतूक कोंडी, रेल्वेचा जीवघेणा प्रवास यााकडेही गोखले यांनी लक्ष वेधलेे आहे. येथील नागरिक मागील पन्नास वर्षात आपल्या जीवनाचा दर्जा शोधत आहेत, अस गोखले यांनी स्पष्ट केले आहे. या शहरातील नागरिकांना कोणीच वाली नसल्याचे चित्र दिसत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शहरातील नागरिकांना सहा हजार पाचशे कोटी रुपयांचा शहर विकासाचा आराखडा तयार असल्याचे सांगितले होते. सामान्य नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या या शब्दावर विश्वास ठेवून युतीला सत्ता मिळवून दिली. मात्र सरकारने आपला शब्द पाळला नसल्याची खंत गोखलेे यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी आपल्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याची वेळ आमच्यावर येऊ नये त्यासाठी आपण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या  प्रचारासाठी कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात येऊ नये, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

वाराणसी या आपल्या मतदारसंघाचा आपण जसा कायापालट केला तसाच बदल येथे घडेल, असे आश्वासन देण्यासाठी आपण येथे यावे अशी विनंतीही गोखले यांनी केली.

शहरातील सद्यस्थिती सर्वजण जाणून आहेत. अनेकांच्या भावना मी शब्दात मांडल्या आहेत. अनेक नागरिकांनी यावर आपल्याशी संपर्क साधत त्यांच्या त्यांची सहमती दर्शवली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे. इतकीच अपेक्षा ठेवून हा पत्रप्रपंच केला आहे, असे गोखले यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizen of kalyan dombivali Written letter to PM Narendra Modi Maharashtra Vidhan Sabha 2019