
मुंबई : दुसऱ्या मात्रेकडे नागरिकांची पाठ
मुंबई : कोरोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेण्याची वेळ जवळ आली असतानाही ऑक्टोबरमध्ये राज्यात ७० लाख जणांनी ती टाळल्याचे राज्य सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यात पात्र ७० लाख, तर मुंबईत ४.६ लाख जणांनी लशीची दुसरी मात्रा घेतलेली नाही, तर देशपातळीवर दहा कोटींहून अधिक नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असे म्हणता येणार नाही. तरीही कोरोना प्रतिबंधक लशीच्या दुसऱ्या मात्रेकडे बहुतांश नागरिकांनी पाठ फिरवली आहे. ही स्थिती निश्चितच चिंताजनक असल्याचे मत राज्य कोरोना कृती दलातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कोरोना रोखण्यासाठी लस हा खात्रीचा उपाय ठरला आहे. त्या माध्यमातून कोरोना संसर्गाला दूर ठेवता येईल. अन्यथा स्थिती आटोक्यात आणणे कठीण होईल, असा सावधगिरीचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.
राज्यभरात कोरोना लशीच्या पुरेशा मात्रा आहेत. लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात राहिल्याचे चित्र आहे. गणेशोत्सव काळ आणि नवरात्रीत लसीकरणाचा वेग मंदावला आहे. उत्सव काळात बऱ्याच जणांनी लशीची दुसरी मात्रा घेण्यास दिरंगाई केली, असे म्हणण्यास वाव असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानची विजयी हॅटट्रिक, अफगाणिस्तानने संधी गमावली!
मिशन कवचला प्रतिसाद नाही
राज्यात ‘मिशन कवच कुंडल’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यात एक कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ते निम्म्यापर्यंतच गाठता आले आहे. कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेसाठी ८४, तर कोवॅक्सिनच्या दुसऱ्या मात्रेसाठी २८ दिवसांचा कालावधी आहे. मात्र अधिक दिवस असलेल्या कोविशिल्ड वा कमी दिवस असलेल्या कोवॅक्सिनचे लाभार्थीही लसीकरण केंद्रावर आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. लसीकरण मोहिमांना ऑक्टोबरमध्ये अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे.
पालिकेचे प्रभाग स्तरावर वॉर रूम
कोरोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेण्यास लाभार्थी केंद्रांवर येत नसल्याचे स्पष्ट झाल्याने अशा पात्र नागरिकांना शोधून काढण्याची जबाबदारी पालिकेने प्रभाग स्तरावरील ‘वॉर रूम’वर सोपवली आहे. यासंदर्भातील यादीही सर्व २४ प्रभागांतील वॉर रूमला पाठविण्यात आली आहे. मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला असून मुंबईत रोज सरासरी ४५ ते ७५ हजार जणांना लस दिली जात आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, दुसरी मात्रा घेण्याऱ्या नागरिकांची यादी प्रभाग स्तरावरील ‘वॉर रूम’कडे सुपूर्द करण्यात आली आहे. वॉर रूमचे अधिकारी लाभार्थ्यांशी वैयक्तिक भेटतील. त्यांनी दुसरी मात्रा का घेतली नाही, याची माहिती जाणून घेतली जाईल.
Web Title: Citizens Ignore To The Second Dose Vaccination
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..