घराच्या प्रतीक्षेत अनेकांनी डोळे मिटले, कित्येकांनी मुंबई सोडली; आतातरी मूळ घरात जाऊ द्या....

घराच्या प्रतीक्षेत अनेकांनी डोळे मिटले, कित्येकांनी मुंबई सोडली; आतातरी मूळ घरात जाऊ द्या....

मुंबई : मूळ घरात जाण्याच्या प्रतीक्षेत आतापर्यंत अनेकांनी कायमचे डोळे मिटले; तर अनेकांनी मुंबई सोडली. आता काही मोजकीच कुटुंब आज नाही तर उद्या स्वत:च्या घरात राहायला मिळेल, या आशेवर जगत आहेत. डोंगरी येथील हाजी कासम चाळीत 35 वर्षांपूर्वी झालेल्या पडझडीनंतर येथील एका भागातील 56 कुटुंबांना प्रतीक्षानगर आणि विक्रोळी कन्नमवारनगर येथील संक्रमण शिबिरात पाठविण्यात आले. मात्र, येथील नागरिकांचे नवीन घरात जाण्याचे स्वप्न 35 वर्षांनंतरही पूर्ण झाले नाही.

मंगेश म्हात्रे यांचे कुटुंब याच चाळीत राहात होते. इमारतीची पडझड झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना प्रतीक्षानगर येथील संक्रमण शिबिरात पाठविण्यात आले. मंगेश यांचा जन्मही संक्रमण शिबिरातील. त्यांनी या संक्रमण शिबिरातच आयुष्याचा तीन दशकांहून अधिक काळ घालवला. आजही मूळ घरात राहायला मिळेल, अशी अपेक्षा म्हात्रे कुटुंबीयांना आहे.

अद्याप तरी ते शक्‍य झाले नाही, अशी खंत मंगेश म्हात्रे यांनी व्यक्त केली. इमारत सोडली तेव्हा 52 ते 56 रहिवासी होते. आता मोजकीच कुटुंबे राहिली आहेत. खासगी विकासकावर विश्‍वास नाही म्हणून म्हाडा इमारती उभारून देईल, या अपेक्षेवर रहिवासी आहेत. जुन्या चाळीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला; तर अनेकांनी मुंबईच सोडल्याचे मंगेश यांनी सांगितले. 

जुलै महिन्यात फोर्ट येथील इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर म्हाडाने या भागातील काही धोकादायक इमारती रिकाम्या करून तेथील रहिवाशांना पश्‍चिम उपनगरातील संक्रमण शिबिरात पर्यायी जागा दिली. मात्र, आता मुलांच्या शाळा सुरू झाल्यास एवढ्या लांब जाणे शक्‍य नाही. त्यामुळे काही कुटुंबांनी आता फोर्ट परिसरातच भाड्याने घरे शोधण्यास सुरुवात केली आहे. भाड्याने घर घेण्यासाठी आता महिन्याला 15 ते 20 हजार रुपये खर्च येणार आहे. हा खर्च कसा परवडणार, असा प्रश्‍न हे रहिवासी नाव न सांगण्याच्या अटीवर उपस्थित करत आहेत. 

144 धोकादायक इमारतीत अजूनही रहिवासी 
मुंबई महापालिकेने यंदा पावसाळ्यापूर्वी 443 धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवली होती. त्यातील 73 इमारती रिकाम्या झाल्याचे पालिकेने सांगितले आहे. 144 धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी न्यायालयात दावा केल्याने या इमारती रिकाम्या करता आलेल्या नाहीत. त्यांच्याकडून स्वत:च्या जबाबदारीवर राहण्याबाबत हमीपत्र लिहून घेतले जात आहे, असेही पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले; तर इतर इमारती रिकाम्या करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 73 रिकाम्या करण्यात आलेल्यांपैकी 19 इमारतींचे वादही न्यायालयात असल्याचे सांगण्यात आले. 

...यामुळे रहिवासी इमारत सोडेनात 
घर सोडले तर पुन्हा कधी परत येऊ, याची खात्री नाही. खासगी इमारत असेल तर पुनर्विकासानंतर मालक घर देईलच, याची शाश्‍वती नाही. त्यामुळे मुंबईतील शेकडो इमारतींमध्ये रहिवासी घर सोडण्याऐवजी जीर्ण झालेल्या इमारतीत जीव धोक्‍यात घालून जगत आहेत. 

पालिकेचे हमीपत्र 
खासगी इमारती रिकाम्या होत नसल्याने काही वर्षांपूर्वी पालिकेचे तत्कालीन सहायक आयुक्‍त देवेंद्र कुमार जैन यांनी रहिवाशांना हमीपत्र लिहून देण्यास सुरवात केली. यात, रहिवाशांच्या नावाच्या उल्लेखासह पुनर्विकासात त्यांना नव्या इमारतीत नियमानुसार घर मिळेल, असे नमुद करण्यात येते. पालिकेच्या या पद्धतीला धोकादायक इमारतींमधील रहिवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

आतापर्यंत इमारत, घर, भिंती कोसळण्याच्या घटना 
2013  :  531 घटना,  101  मृत्यू,  183 जखमी 
2014  :  343 घटना,   21   मृत्यू,  100 जखमी 
2015  :  417 घटना,   15   मृत्यू,  120 जखमी 
2016  :  486 घटना,   24   मृत्यू,  172 जखमी 
2017  :  568 घटना,   66   मृत्यू,  165 जखमी 
2018  :  619 घटना,   15   मृत्यू,  79 जखमी 
2019  :  622 घटना,   51   मृत्यू,  227 जखमी 
2020  :  2 इमारती कोसळून 12 जणांचा मृत्यू;
तर नाल्यात घर खचून सांताक्रूझ येथे तीन जणांचा मृत्यू 
--------------
(संपादन : प्रणीत पवार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com