मुंबईचे मरिना शहर होणार! वाचा काय आहे बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईचे मरिना शहर होणार! वाचा काय आहे बातमी

मुंबईचे मरिना शहर होणार! वाचा काय आहे बातमी

मुंबई : येत्या वर्षात मुंबई शहराची मरिना शहर अशी नवीन ओळख निर्माण होणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट २०२० मध्ये गेट वे ऑफ इंडियाजवळ मरिना प्रकल्प उभारत आहे. याद्वारे मुंबईतील जल पर्यटनाचा विस्तार केला जाणार आहे. त्यासाठी प्रकल्पात ३०० छोट्या बोटींचा (याट) समावेश केला जाणार आहे.

मोठी बातमी ः शिवसेनेत नाराजीचा स्फोट


३५७ कोटींचा हा प्रकल्प असून २०२२ मध्ये तो पूर्ण होणार आहे. एकूण परिसर ८.०२ हेक्‍टर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या निविदा याच महिन्यात खुल्या केल्या जातील, असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितले. बोटींची देखभाल, दुरुस्ती मरिना येथेच केली जाईल. ३६५ दिवस ते खुले असणार आहे.

#HopeOfLife  मुलीची कर्करोगाशी तर वडिलांची परिस्थितीशी झुंज

मरिना प्रकल्पामुळे मुंबई हे जल पर्यटनाचे नवे हब बनेल. गेटवे ऑफ इंडिया येथील बोटी मरिनामध्ये समाविष्ट होतील. याशिवाय गेटवे ऑफ इंडिया, डोमॅस्टिक क्रूझ टर्मिनल, आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल, कान्होजी आंग्रे दीपगृह ही ठिकाणे मरिनाशी जोडली जातील. त्यामुळे मुंबईच्या जल पर्यटनाला चालना मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमधून येणाऱ्या परदेशी पर्यटकांनाही मरिना आकर्षित करेल.

मरिना प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्टचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रकल्पामुळे जल पर्यटनामध्ये वाढ होईल. प्रकल्पासाठी सरकारच्या स्थायी अर्थ समितीची आणि पर्यावरणाबाबतची मंजुरी मिळाली आहे. या महिन्यात प्रकल्पाच्या निविदा मागवण्यात येतील. दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल.
- संजय भाटिया, अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट.

ईस्टर्न वॉटरफ्रंट सुरू होणार
भाऊचा धक्कापासून एक किलोमीटर असलेला ईस्टर्न वॉटरफ्रंट जानेवारीमध्ये सुरू करण्यात येत आहे. याचे काम पूर्ण झाले आहे. मांडवा आणि नेरूळ येथे जाण्यासाठी येथून रोपॅक्‍स सेवा सुरू होईल. तसेच पर्यटकांना समुद्रात स्केटिंगचाही आनंद घेता येणार आहे. येथे मनोरंजनासाठी ओपन ऑडिओ थिएटर बांधले आहे. सायकलिंग, जॉगिंगसाठी वॉकवे बांधण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी रेस्टॉरंटचीही सुविधा आहे. ईस्टर्न वॉटरफ्रंट पर्यटकांसाठी तसेच मुंबईकरांसाठी नवे टुरिझम डेस्टिनेशन बनेल.

वॉटर टॅक्‍सीचा शुभारंभ
मुंबईची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जल वाहतुकीचा वापर केला जाणार आहे. नव्या वर्षात वॉटर टॅक्‍सी सेवा मुंबई पोर्ट ट्रस्ट सुरू करणार आहे. यासाठी सहा वॉटर टॅक्‍सींना परवाने देण्यात आले आहेत. यामध्ये एअर बोटस्‌चा समावेश आहे. वॉटर टॅक्‍सी सेवा कान्होजी आंग्रे दीपगृह, करंजा, जेएनपीटी, बेलापूर, नेरूळ, वाशी, ठाणे या ठिकाणी उपलब्ध असतील. जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान ही सेवा सुरू केली जाईल, असे संजय भाटिया यांनी सांगितले.

 

Web Title: City Mumbai Going Have New Identity Called Marina

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..