esakal | #HopeOfLife : मुलीची कर्करोगाशी; तर वडिलांची परिस्थितीशी झुंज
sakal

बोलून बातमी शोधा

#HopeOfLife : मुलीची कर्करोगाशी; तर वडिलांची परिस्थितीशी झुंज

माझी मुलगी दहावीत असताना तिला हाडाचा कर्करोग झाल्याचे समजले. गेल्या वर्षभरापासून परळच्या टाटा स्मारक रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत मात्र राहण्याची कोणतीही सोय नसल्याने आणि खिशातही पुरेसे पैसे नसल्याने रस्त्यावर राहावे लागते....

#HopeOfLife : मुलीची कर्करोगाशी; तर वडिलांची परिस्थितीशी झुंज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : “माझी मुलगी दहावीत असताना तिला हाडाचा कर्करोग झाल्याचे समजले. गेल्या वर्षभरापासून परळच्या टाटा स्मारक रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत मात्र राहण्याची कोणतीही सोय नसल्याने आणि खिशातही पुरेसे पैसे नसल्याने रस्त्यावर राहावे लागते. आतापर्यंत शस्त्रक्रिया आणि उपचारावर पाच ते सहा लाख रुपये खर्च झाले आहेत. उपचारासाठी महिन्याला २० ते ३० हजार खर्च होतात. मोलमजुरी करून जगणारी आम्ही माणसं... उसनवारीवर पैसे घेऊन मुलीवर उपचार सुरू आहेत; मात्र हे पैसे कधीपर्यंत पुरणार”, अशी खंत हिंदमाता येथील उड्डाणपुलाखाली झोपलेल्या मुलीकडे हताशपणे पाहत उमेश टोपले व्यक्त करतात.

महत्वाचं ः #HopeOfLife : पुरःस्थ ग्रंथीचा कर्करोग

पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात राहणारे उमेश टोपले यांची मुलगी काजल उड्डाणपुलाखाली चादर अंथरून झोपलेली दिसते. दहावीत असताना तिला हाडाचा कर्करोग झाल्याचे पालघर येथील डॉक्‍टरांनी केले. दहावीची परीक्षा झाल्यानंतर तिच्यावर टाटा स्मारक रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. रेडिएशनही देण्यात आले; मात्र कर्करोगाचा हा आजार अद्यापही पूर्णपणे बरा झाला नाही. दर महिन्याला मुंबईला उपचारासाठी यावे लागते. आतापर्यंत पाच ते सहा लाख रुपये खर्च झाले. रेडिएशनसाठी आता पुन्हा पैसे भरायचे आहेत. नातेवाईकांकडून ओळखी-पाळखीच्या लोकांकडून पैसे जमवून कसे तरी उपचार करत आहोत, असे टोपले खंतपणे सांगतात.
आमचा उदरनिर्वाह शेती आणि शेतमजुरीवर चालतो. पावसाळ्यात चारपाच महिने शेती करतो. त्यानंतर मोलमजुरी आणि रोजगार हमी योजनेवर मिळेल ते काम करतो. त्यामुळे महिन्याला १० हजारांच्या वर कधी उत्पन्न मिळत नाही; मात्र गेल्या वर्षभरापासून मुलीच्या उपचारासाठी महिन्याला २० ते ३० हजार रुपये खर्च होत असल्याचे टोपले हताशपणे सांगतात. मुंबईत आल्यावर राहण्याचा खर्च परवडत नाही म्हणून रस्त्यावरच झोपतो. मुलीने वर्षभर जमिनीला पाय टेकवला नाही; पण ती या आजारातून बरी होईल या आशेवर आमचा लढा सुरू आहे. ती पुन्हा स्वत:च्या पायावर चालेल, असा विश्‍वास टोपले व्यक्त करतात.

हेही वाचा ः #HopeOf:ife उपचाराचा खर्च वार्षिक कमाईच्या पाचपट अधिक

टाटा रुग्णालयाच्या परिसरात असे एक नाही तर अनेक उमेश टोपले पाहायला मिळतात. उत्तर भारतातून टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोणी आपल्या चारपाच वर्षांच्या मुलावर उपचार करण्यासाठी आलेले असतात; तर कोणी आपल्या वडिलांच्या उपचारासाठी आलेले असतात. मुंबईत राहणे परवडत नसल्याने अनेकांनी रस्त्याच्या कडेला, उड्डाणपुलाखाली चुली मांडल्याचे चित्र पाहायला मिळते.

पैसा जातोच; मजुरीही चुकते...
गेल्या वर्षभरापासून महिन्यातून किमान आठवडाभरासाठी तरी मुंबईला यावे लागते. रोज पाड्यावरून मुंबईला प्रवास करणे शक्‍य नाही. त्यामुळे येथेच राहतो. त्यामुळे सातआठ दिवसांची मजुरीही जाते. मोठी मुलगी लहान-मोठी नोकरी करून कुटुंब चालवतेय, असे टोपले सांगतात.
 

loading image